नांदेड

स्मृती लहरीचे लेखक ऍड. श्री शामसुंदररावजी अर्धापूरकर जीवनाच्या लहरीतून मुक्त; सायंकाळी  6.30 वाजता  शांतीधाम, गोवर्धघाट येथे अंतिमनिरोप  

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनातील घटना स्मृतीलहरी या पुस्तकात लिहिणाऱ्या ऍड.शामसुंदररावजी अर्धापूरकर हे सुध्दा जीवनाच्या लहरींमधुन मुक्त झाले आहेत. सायंकाळी 6.30 वाजता त्यांना शांतीधाम, गोवर्धनघाट येथे निरोप दिला जाणार आहे.
                    निजाम राजवट, त्यानंतर स्वतंत्र भारताची राजवट पाहणाऱ्या ऍड.श्री.शामसुंदररावजी व्यंकटरावजी देशमुख(अर्धापूरकर) (वय 91) यांचे आज 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता निधन झाले आहे. त्यांना सायंकाळी 6.30 वाजता शांतीधाम, गोवर्धनघाट येथे अंतिम निरोप दिला जाणार आहे अशी माहिती त्यांचे पूत्र यदुपत अर्धापूरकर यांनी दिली आहे. ऍड.शामसुंदररावजी अर्धापूरकर यांच्या पश्चात पत्नी,मुलगी, जावई, मुलगा, सुन, नातू असा मोठा परिवार आहे. नांदेड जिल्ह्यातील असंख्य वकीलांनी त्यांना आपले श्रध्दासुमन अर्पित केले आहे.
                      अत्यंत सुस्वभावी, सुसंस्कृत आणि मृदूभाषी ऍड.श्री.शामसुंदररावजी अर्धापूरकर यांचा जन्म निजाम राजवटीत 27 एप्रिल 1932 रोजी  झाला. अर्धापूर येथे अत्यंत नामांकित देशमुख घराण्यात जन्मलेल्या ऍड.श्री.शामसुंदररावजी अर्धापूरकर यांनी 1957 मध्ये आजच्या तेलंगणा राज्यातील उस्मानीया विद्यापीठातून विधी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 1965 ते 1978 या कालखंडात अतिरिक्त सरकारी वकील या पदावर काम केले. 1980 मध्ये त्यांची नियुक्ती रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी झाली. 1998 मध्ये ते नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष झाले. सन 2010 मध्ये सोलापूर अभिवक्ता संघाने त्यांना विधीसेवा पुरस्कार देवून त्यांचा सन्मान केला. बार कॉन्सील ऑफ मुंबईच्यावतीने त्यांचा ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून गौरव करण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचे 1975 पासून सलग तीन वेळा ऍड.शामसुंदररावजी अर्धापूरकर कार्यकारी संचालक होते. ते नांदेड येथील संध्याछाया वृध्दाश्रमाचे उपाध्यक्ष आणि नांदेड ज्येष्ठ नागरीक संघाचे सभासद पण होते.वास्तव न्यूज लाईव्ह परिवार अर्धापुरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *