नांदेड(प्रतिनिधी)-उच्चशिक्षीत माणसे सुध्दा आंधश्रध्दांना बळी पडतात आणि आपले सर्वस्व गमावून बसतात. शासनाने त्यासाठी कायदा केला, प्रसारमाध्यमे त्याबद्दल जागरुकता पसरवितात तरीपण भोंदुबाबांचा प्रकार मात्र थांबत नाही. असाच एक घटनाक्रम नांदेड शहरात घडला आणि तुला श्राप लागला असे सांगून तीन जणांनी रेल्वेतील एका अभियंत्याची 10 लाख 19 हजारांना फसवणूक केली आहे.
नांदेड शहरातील रेल्वे विभागात कार्यरत वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर मुरारीलाल जयराम मिणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना सन 2019 पासून पार्कींसन नावाचा आजार झाला. याबाबत सुरू असलेल्या उपचारामध्ये त्यांची भेट कोण्या डॉक्टर सिद्दीकीसोबत झाली. दि.21 फेबु्रवारी रोजी डॉ.सिद्दीकी त्यांचा सहकारी आणि कोणी मनोज शर्मा नावाचे तीन माणसे सकाळी त्यांच्या घरी आली आणि त्यांनी तुला कोणाचा तरी श्राप लागला आहे आणि त्यामुळे तुझ्या रक्त धमन्यामध्ये गाठा झाल्या आहेत. आम्ही डॉक्टर आहोत असे सांगत मुरारीलाल मिणाच्या शरिरावर अनेक जागी सर्जिकल ब्लेडने मारले. पोलीसांनी या तक्रारीनुसार तीन जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 323, 34 आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर आमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध व समुळ उच्चाटन कायद्या 2013 मधील कलम 3(1), 3(2) नुसार गुन्हा क्रमांक 57/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रविण अगलावे यांच्याकडे देण्यात आला आहे.
