ताज्या बातम्या नांदेड

निरामय हॉस्पीटलला 10 हजार रुपये दंड

नांदेड(प्रतिनिधी)-सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याला धोका असणारा जैविक कचरा (बायो मेडिकल वेस्ट) नियमाप्रमाणे विल्हेवाट न लावता दररोज शहरात फिरणाऱ्या घंटागाडीमध्ये तो बायो मेडिकल वेस्ट टाकणाऱ्या निरामय हॉस्पीटलला महानगरपालिकेने 10 हजार  रुपये रोख दंड ठोठावला आहे. 
                   महानगरपालिकेने मागील अनेक दिवसांपासून बायो मेडिकल वेस्ट घंटागाडीत टाकणाऱ्या हॉस्पीटल्सवर दंडाची कार्यवाही केली आहे. या बाबत वर्तमानपत्रांनी विविध हॉस्पीटलला ठोठावण्यात आलेला दंड प्रसिध्द केला. तरीपण उच्च शिक्षीत आणि इतरांना आरोग्य सेवा देतांना भरपूर फिस आकारणाऱ्या डॉक्टरांना आपल्या दवाखान्यात तयार होणारा जैविक कचरा योग्य रितीने नष्ट करण्याचे कळत नाही. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे.
                         आज 23 फेबु्रवारी रोजी क्षेत्रीय कार्यालय क्रमांक  3 आणि प्रभाग क्रमांक 17 मधील निरामय हॉस्पीटलने आपल्या दवाखान्यात तयार झालेला जैविक कचरा नगरपालिकेच्या घंटागाडीत टाकला आणि ही बाब महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हेरली. लगेच निरामय हॉस्पीटल कडून या चुकीच्या कामासाठी 10 हजार रुपये दंड ठोठावून तो वसुल करण्यात आला. ही कार्यवाही मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेचे गुलाम मोहम्मद सादेक, रमेश चौरे, राजेंद्र गंदमवार, बालाजी देसाई, संजय जगतकर, वसीम तडवी, किशन तारु यांनी केली. महानगरपालिकेने हॉस्पीटल, क्लिनीक, दवाखाने इत्यादी व्यवसाय धारकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या संस्थेत तयार होणारा दैनंदिन जैविक कचरा मनपाच्या घंटागाडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता मनपाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे द्यावा. नाही तर घनकचरा व्यवस्थापन नियम 2016आणि बायो मेडिकल वेस्ट हॅन्डलिंग रुल्स 1998 मधील तरतुदीनुसार वैद्यकीय व्यवसाय धारकांविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *