विशेष

ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्या दोघांना सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या पत्नीचे रहिवासी प्रमाणपत्र कागदपत्रे नसतांना मिळावे अशी अपेक्षा करून कायद्यातील तरतुदीमध्ये दाखवलेले कागदपत्र जोडल्याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र देणार नाही अशी भुमिका घेणाऱ्या शेलगाव (बु)येथील ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या दोघांना नांदेड येथील तदर्थ सत्र न्यायाधीश संजय दिघे यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सेलगाव (बु) ता.अर्धापूर येथे सन 2018 मध्ये ग्रामसेवक या पदावर देविदास विठ्ठल देशमुख हे कार्यरत होते. 24 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजता ते आपल्या कार्यालयात काम करीत असतांना शेळगाव गावातील भास्कर शिवाजी राजेगोरे (35) आणि माधव गणपत राजेगोरे (50) हे दोघे आले. त्यातील एकाच्या पत्नीचे रहिवासी प्रमाणपत्र त्यांना हवे होते. प्रमाणपत्र घेण्यासाठी कायद्यातील तरतुदीनुसार जी कागदपत्रांची आवश्यकता असते ती कागदपत्रे जोडल्याशिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही अशी भुमिका देविदास देशमुख यांनी घेतली. त्यामुळे रागावून ग्राम पंचायत कार्यालयातच भास्कर राजेगोरे आणि माधव राजेगोरे या दोघांनी ग्रामसेवक देविदास देशमुखला थापडबुक्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या डोक्यावर व तोंडावर मार लागला.
ग्रामसेवक देविदास देशमुख यांच्या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 117/2018 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक त्र्यंबक गायकवाड यांनी केला. भास्कर राजेगोरे आणि माधव राजेगोरेला अटक करून त्या दोघांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या न्यायालयीन प्रक्रियेत सत्र खटला क्रमांक 114/2019 सुरु झाला तेंव्हा या प्रकरणात सात साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश संजय दिघे यांनी माधव राजेगोरे आणि भास्कर राजेगोरे यांना ग्रामसेवक देविदास देशमुखला मारहाण केल्याप्रकरणी दोषी जाहीर केले. या दोघांना विविध कलमांनुसार विविध शिक्षा देण्यात आल्या पण त्या सर्व शिक्षा त्यांना एकत्रित भोगायच्या आहेत म्हणून 6 महिन्या सक्तमजुरी आणि प्रत्येकाला 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्याबाजू ऍड. यादव तळेगावकर यांनी मांडली. अर्धापूरचे पोलीस अंमलदार व्ही.एम.पठाण यांनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका पार पाडली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *