नांदेड(प्रतिनिधी)-खूनाचा गुन्हा दाखल होताच नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने आणि वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने विरसिंघचा खून करणाऱ्या जयमलसिंघ उर्फ गंगाला 24 तासात जेरबंद केले आहे.
दि.15 फेबु्रवारी रोजी रात्री नगिनाघाट परिसरात विरसिंघ गुरदेवसिंघ तिवाना (20) यास जबर मारहाण झाली आणि मारहाण करणाऱ्यानेच त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 16 फेबु्रवारी रोजी विरसिंघचे बंधू हरदिपसिंघ गुरुदेवसिंघ तिवाना यांना आपल्या भावाच्या जखमी असल्याची माहिती मिळाली. पुढे उपचारादरम्यान 20 फेबु्रवारीच्या रात्री उपचार घेणारे विरसिंघ तिवाना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 22 फेबु्रवारी रोजी हरदिपसिंघ तिवाना यांच्या तक्रारीवरुन विरसिंघचा खून करणारा जयमलसिंघ उर्फ गंगा हरबनसिंघ धारीवाले (20) याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 49/2022 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी आपले वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासोबत सल्लामसलत करून या गुन्ह्यातील मारेकरी जयमलसिंघ उर्फ गंगाला पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहु, गोविंद मुंडे, मारोती तेलंग, बालाजी येळगे, मोतीराम पवार आणि शेख करीम यांना निजामाबाद (तेलंगणा ) येथे पाठवले. या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरू केलेल्या कामाला 24 तास पुर्ण होण्याअगोदरच यश आले आणि पोलीस पथकाने जयमलसिंघ उर्फ गंगा हरमलसिंघ धारीवाले यास गजाआड केले आहे.
या कामगिरीसाठी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले आहे.