नांदेड(प्रतिनिधी)-19 फेबु्रवारी रोजी मगनपुरा भागात अनिल शेजुळे या 20 वर्षीय युवकाचा खून करणाऱ्या सहा पैकी चार जणांना शिवाजीनगर पोलीसांनी 24 तासात अटक केल्यानंतर आज 21 फेबु्रवारी रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर.पी.घोले यांनी या चार मारेकऱ्यांना पाच दिवस, 26 फेबु्रवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
19 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मगनपुरा भागात अनिल मुरलीधर शेजुळे (20) या युवकाचा कांही जणांनी खून केल्याची तक्रार त्याच्यासोबतचा राजकुमार एकनाथ शेजुळे यांनी दिली. त्या तक्रारीमध्ये 6 जणांची नावे होती. 20 फेबु्रवारी रोजी या घटनेला 24 तास पुर्ण होण्याअगोदरच शिवाजीनगर पोलीसांनी निलेश रावसाहेब गोरठेकर (22) रा.बाबानगर नांदेड, राहुल नागनाथ काळे (22) रा.खोब्रागडेनगर नांदेड, रोहित उर्फ चिंक्या सुभाष मांजरमकर (21) रा.पौर्णिमानगर नांदेड, योगेश उर्फ गोट्या चंदर सोनकांबळे (22) रा.हर्षनगर नांदेड अशा चार जणांना अटक केली. या खून प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
आज गायकवाड आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या चार मारेकऱ्यांना न्यायालयात हजर केले. तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. ती मागणी न्या.घोले यांनी पाच दिवसांसाठी मंजुर केली आहे.
