नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी मगनपुरा भागात एका 20 वर्षीय युवकाचा खून झाला. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील फिर्यादीच माझ्या मुलाच्या खूनासाठी जबाबदार असल्याचा अर्ज मयत युवकाच्या वडीलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिला आहे. फिर्यादीने या प्रकरणात सहा आरोपींच्या नावासह तक्रार दिलेली आहे. या प्रकरणातील कांही जण पोलीसांच्या ताब्यात आहेत.
काल दि.19 फेबु्रवारी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती. शहरभर शिवजयंतीची धामधुम सुरू असतांना सायंकाळी 5.15 वाजता साठे चौक ते नाईक चौक रस्त्यावरील होन्डा शोरुमजवळ कांही जणांनी एका युवकाला चाकुने त्याच्या शरिरावर गळ्यावर, पोटात, हातावर आणि पिंडरीवर वार करून त्याला जिवे मारले. यावेळी त्याच्यासोबत इतर दोन जण होते. त्यातील मयत युवकाचे नाव अनिल मुरलीधर शेजुळे (20) रा.चिखली ता.जि.नांदेड सोबतच्या दुसऱ्या युवकाचे नाव राजकुमार एकनाथ शेजुळे (28) रा.चिखली आणि तिसरा राजकुमारचा भाचा उमकांत असे होते. मारहाणीची घटना झाल्यानंतर पोलीसांना माहिती मिळताच पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे, द्वारकादास चिखलीकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी जमा झाला. त्यानंतर अनिल शेजुळे सोबत असलेल्या राजकुमार एकनाथ शेजुळेने दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 67/2022 कलम 302, 307, 341, 143, 144, 148, 149 भारतीय दंड संहिता आणि 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे दाखल केला. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगरचे पोलीस उपनिरिक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. हा गुन्हा 20 फेबु्रवारीच्या रात्री 1.35 वाजता दाखल झाला.
20 फेबु्रवारी रोजी मयत अनिल शेजुळेचे वडील मुरलीधर लक्ष्मण शेजुळे यांनी दिलेल्या एका अर्जानुसार त्यात पुरवणी जबाब नोंदविणे असा विषय लिहिला आहे. या अर्जामध्ये 19 फेबु्रवारी रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास राजकुमार एकनाथ शेजुळे अर्थात गुन्हा क्रमांक 67 चा फिर्यादी यानेच माझ्या मुलाला फुस लावून नांदेडला आणले आणि आपल्या मित्रांसोबत कटरचुन अनिल शेजुळेचा खून केला आहे. सोबतच घटना घडताच मला फोनवर संपर्क साधून अनिलला साधारण दुखापत झाली आहे असे सांगितले. त्यानंतर आम्ही दवाखान्यात आलो तेंव्हा आम्हाला समजले की, अनिलचा मृत्यू दवाखान्यात आणण्यापुर्वीच झाला आहे. त्या ठिकाणी राजकुमारचा मेहुणा भगवान पुयड रा.देगाव याने माझ्या हातातील मोबाईल घेवून त्यावर आलेला कॉल डाटा डिलिट केला. या सर्व घटनाक्रमावरुन माझ्या मुलाचा राजकुमारनेच खून केला आणि त्याचे कारण राजकुमारचे वडील आणि माझे संबंध चांगले नाहीत. सन 2015 मध्ये राजकुमार आपल्या पत्नीच्या मृत्यू कारणामुळे झालेल्या गुन्ह्यात आरोपी होता आणि तो अनेक दिवस तुरूंगात होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कांही तासातच आलेल्या या नविन अर्जाने पोलीसांच्या तपास मोहिमेत मोठ्या आव्हान उभे राहिले आहे. कारण राजकुमार शेजुळेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला तेंव्हा त्यामध्ये नितेश पाटील, गोट्या, चिंग्या तरटे, राहुल काळे आणि निलेश गोरठेकर अशी 6 आरोपींची नावे नमुद आहेत. सध्या राजकुमार शेजुळे सुध्दा पोलीसांच्या ताब्यातच आहे आणि इतर कांही जणांना सुध्दा शिवाजीनगर पोलीसांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहे.