विशेष

कौठा परिसरात तलाठी मनोज देवणे आणि माजी नगरसेवक राजू गोरे हे 8 कोटीच्या भुखंडावर कब्जा करत असल्याची तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)-तलाठी सज्जा कौठा येथील तलाठी मनोज देवणे आणि माजी नगरसेवक राजू गोरे यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून गट क्रमांक 85 मधील तब्बल 7 ते 8 कोटी रुपयांच्या मोकळ्या जागेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे ताबा मारण्यास सुरूवात केली आहे. त्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी करणारा अर्ज जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्याकडे सादर करून 20 दिवस झाले तरी पण अद्याप त्यावर कांहीच कार्यवाही झालेली नाही.
नवीन कौठा परिसरात राहणारे सुनिल पाटील या व्यक्तीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, आयुक्त नांदेड मनपा आणि तहसीलदार नांदेड यांना दिलेल्या अर्जानुसार तलाठी मनोज देवणे हे त्यांच्या कार्यायात व अधिकारांचा गैरवापर करून खाजगी कार्यालयाप्रमाणे काम केले जात आहे. मनोज देवणे यांनी अनेक गैर व्यवहार केले आहेत.
माजी नगरसेवक राजू गोरे यांनी गट क्रमांक 85 कौठा येथील तब्बल 7 ते 8 कोटी रुपये किंमत असलेली जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे कब्जा करणे सुरू केले आहे. कोणी जाब विचारला तर मी ही जागा खरेदी केल्याचे ते दादागिरीने सांगतात. गट क्रमांक 85 मध्ये कवटेकवार नगर ही भुखंड मालिका मयत विठ्ठल गोविंदराव कवटेकवार यांनी तयार केलेली आहे. ही भुखंड मालिका तयार करतांना त्यांनी रस्ता आणि 6 हजार चौरस फुट जागा मोकळी सोडलेली आहे. सध्या त्यांच्या नावे हीच 18 गुंठे जागा शिल्लक आहे. शिल्लक राहिलेली ही 6 हजार चौरसफुट जागा आता 80 फुटाच्या रस्त्यावर आली आहे. मोकळ्या जागेच्या चारही बाजूंनी रस्ता आहे. ही मोकळी जागा गट क्रमांक 85 मधील भुखंड धारक व रहिवाशांसाठी सार्वजनिक जागा आहे तरीपण तलाठी मनोज देवणे आणि माजी नगरसेवक राजू गोरे हे या जागेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे ताबा घेत आहेत. या अर्जासोबत सुनिल पाटील यांनी भुखंडांचा लेआऊट, 7/12 ची प्रत आणि त्या जागेचे फोटो जोडलेले आहेत. ही जागा कौठ्यातील मामा चौकाच्या अलीकडे आहे.
भुखंडांचे श्रीखंड खाण्याचा प्रकार हा कांही नवीन नाही. जानेवारी महिन्यात दिलेल्या या अर्जावर आज फेबु्रवारीची 16 तारीख असतांना अद्याप कांही एक कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सुनिल पाटील यांनी आपल्या अर्जाची प्रत वास्तव न्युज लाईव्ह प्रतिनिधींना पोस्टाद्वारे पाठवली आहे.एखाद्या सर्व्हे क्रमांकामध्ये तयार झालेल्या भुखंड मालिकेत तेथील रहिवाशांसाठी मोकळी जागा ठेवलीच जाते. सर्व्हे क्रमांक 85 चे मुळ मालक कवटेकवार यांचे निधन झाले असल्याने कोणी कांही विचारणारा शिल्लक राहिला नाही अशा परिस्थितीत ही जागा आपल्या मालकीची दाखविणारे कागदपत्र तयार करून त्यावर आपला कब्जा आहे हे दाखविण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने बेकायदेशीरच आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन तरी या घटनेकडे बारकाईने पाहतील आणि फुकटात करोडो रुपयांची लाटणाऱ्यांची आणि त्यांना बनावट कागदपत्र तयार करण्यात मदत करणाऱ्यांवर नक्कीच कांही तरी कार्यवाही करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.