
महाराष्ट्रातील परिक्षांमध्ये होणारे गैरप्रकार आपण नेहमीच पाहिले, अनुभवले आणि त्यावर चर्चा केली. काल परवाच नांदेडचे माजी मनपा आयुक्त सुशिल खोडवेकर यांना सुध्दा एका परिक्षा घोटाळ्यात अटक झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने सध्या कला शाखेतील विविध वर्गांच्या परिक्षा सुरू आहेत. त्यामध्ये वायएमएन ऑनलाईन एक्झाम गु्रप नावाचा एक आणि एसआरटीएम युनिर्व्हसीटी बी.सी….नावाचा दुसरा व्हॉटसऍप गु्रप आहे. या दोन्ही गु्रपवर विद्यार्थ्यांकडून प्रश्न पत्रिकेतील उत्तरे पाहिजे असतील तर त्यासाठी 100 रुपये घेतले जात आहेत. उत्तरांचे कागद व्हॉटसऍपग्रुपवर पाठवले जात आहेत आणि विद्यार्थ्यांकडून ते पैसे घेऊन त्यांना परिक्षेत मदत केली जात आहे.
महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या परिक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी द महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस ऍट युनिर्व्हसीटी, बोर्ड ऍन्ड ऑदर स्पेसीफाईड एक्झामीनेशन ऍक्ट 1982 पुर्वीपासूनच अस्तित्वात होता. पुढे 1992 मध्ये या कायद्याला रिपील करून नवीन महाराष्ट्र शासनाने नवीन अधिसुचना जारी केली. ही अधिसुचना गुगलवर 48.5.ए या परिशिष्टात पाहायला मिळते. त्यात जवळपास 1982 च्या कायद्यामधील सर्व तरतुदी आहेत. या कायद्यातील 11 कलमांमध्ये परिक्षेतील प्रश्न पत्रिकेतील प्रश्न आणि त्याची उत्तरे सार्वजनिक करण्यास बंदी टाकलेली आहे. कायद्यानुसार हा गुन्हा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 शी जोडलेला आहे आणि त्यातील तरतुदीनुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हा खटला चालविला जातो. या कायद्याला कचराकुंडीत टाकून सध्या स्वारातीमच्यावतीने सुरू असलेल्या कला शाखेच्या परिक्षांमध्ये पैसे घेवून उत्तरे देण्याचा घोटाळा सुरू आहे. पैसे सुध्दा गुगलपेद्वारे घेतले जात आहेत.
परिक्षेमधील घोटाळ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या या दोन गु्रपच्यामध्ये झालेल्या कांही चॅट आमच्या हाती लागल्या त्या चॅटमध्ये लिहिलेले सुध्दा मजेशीर आहेत आणि कोणालाही त्यापासून लाज वाटत नाही. प्राप्त झालेल्या व्हॉटसऍप चॅटप्रमाणे कोणी प्रोफेसर कर्णेकर एस.व्ही. लिहित आहेत की, आतापर्यंत फक्त 25 टक्के विद्यार्थ्यांनी योगदान दिले आहे. एवढ्या योगदानात पाणीपुरेचे आंबट पाणी सुध्दा येत नाही. ट्रीट काय वांगू देऊ सरांना. राहिलेल्या विद्यार्थ्यांनी लवकरच योगदान देवून सहकार्य करावे. ज्या विद्यार्थींनीकडे ऑनलाईन पेमेंटची सोय नाही त्यांच्यासाठी एक स्वतंत्र सोय आहे त्यात एका विद्यार्थीनीचे नाव लिहुन तिच्याकडे जमा करावे असे लिहिले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा नाही त्यांच्यासाठी चार विद्यार्थ्यांची नावे या चॅटमध्ये लिहिलेली आहेत. त्यांच्याकडे जमा करावे असे लिहुन प्रोफेसर कर्णेकर यांनी धन्यवाद असे शब्द लिहुन हात जोडलेले आहेत. एकाने या चॅटमध्ये चिंगुटपणा न करता सर्वांनी सहकार्य करावे असे लिहिले आहे. एकजण लिहितो 100 रुपये म्हणजे काय तुमची सर्व प्रॉपर्टी मागल्यासारखे करू नका असे लिहिलेले आहे. यावर प्रोफेसर कर्णेकर लिहितात की, माझी फक्त अनसर कि देऊन बाकी कॉलेजचे सर 500 रुपये घेत आहेत.
याही पुढे दुसऱ्या एका व्हॉटसऍपगु्रपवर असा संदेश लिहिलेला आहे की, गु्रपमधील सर्वांना कळविण्यात येते की, आम्ही तुमच्यासाठी रिस्कघेवून पेपर सेंड करीत आहोत त्यामुळे सर्व पेपरचे मिळून कांही फिस मला वर द्यावी लागते. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, आप-आपली फिस जमा करावी. माझ्या अकाऊंटवर द्या किंवा संदीप सरकडे फोन पे करा पण उद्याचा पेपर हवा असेल तर प्लिज तुम्हाला फिस जमा करावी लागेल तरच उद्याचा पेपर मिळेल. फिस जस्ट 100. थॅक्यू.
या संदेशांमध्ये लिहिलेल्या शब्दांप्रमाणे परिक्षेमध्ये गैरप्रकार करण्याच्या कायद्याला बिलकुल न भिता थेट पैशांची मागणीच दिसते. सोबतच हा उद्याचा पेपर म्हणजे परिक्षा संपेपर्यंत हा सर्व घोटाळा सुरूच राहणार आहे. या शब्दांमधील वर द्यावी लागते वर म्हणजे काय याचा सविस्तर उल्लेख नाही. हा गुन्ह्यातील तपासाचा विषय आहे. पण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा सुरू आहे हे या व्हॉटसऍप चॅटवरून र्निविवादपणे सिध्द होत आहे. यामध्ये अशी माहिती आली आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे फोन पे द्वारे पैसे देवून प्राप्त केली त्यांनी तर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पैसे देवून पाठवले आहेत. त्या संदर्भाची खात्रीलायक माहिती मात्र प्राप्त झाली नाही.
महाराष्ट्रात अत्यंत जोरदार सायबरसेल कार्यरत आहे. पण सायबरसेलकडे याबाबत तक्रार कोण देईल कोणाला याची चिंता आहे कोण इमानदारपणे परिक्षेचे काम करू इच्छीतो हे असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
