ताज्या बातम्या विशेष

बेघर पत्रकारांना दिलेली जागा महानगरपालिका ताब्यात घेणार

नांदेड(प्रतिनिधी)-तब्बल 21 वर्षानंतर महानगरपालिका नांदेडला बेघर पत्रकारांसाठी दिलेल्या जमीनीची आठवण झाली आणि आता ती जमीन परत का घेण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस मनपा आयुक्तांनी दि.11 फेबु्रवारी 2022 रोजी जारी केली आहे. पण या बेघर पत्रकारांच्या पत्रकार सहवास को. ऑप हाऊसींग सोसायटी नांदेडचा अध्यक्ष कोण आहे हे या कारणे दाखवा नोटीसमध्ये लिहिलेले नाही. याही पेक्षा बेघर पत्रकार संघटनेचा अध्यक्ष सापडला तरी त्या बेघर पत्रकारांच्या जागेवर उभे असलेले कॉंगे्रस आमदारांचे टोलेजंग घर आणि इतर राजकीय वरदहस्त प्राप्त असलेल्या लोकांच्या इमारती ताब्यात घेण्याची हिंम्मत महानगरपालिका दाखविणार काय ? आणि कायदाच सर्वात मोठा असतो, कायद्यापुढे कोणीच भारतात मोठे नाही हे दाखवून देणार काय? या प्रश्नांची उत्तरे भरीव कार्यवाही झाल्यानंतर शोधता येतील.
नांदेडमध्ये अत्यंत हालाखीची अवस्था असणाऱ्या बेघर पत्रकारांना महानगरपालिका नांदेडने दोन एकर जागा दिली. ही जागा सर्व्हे नंबर 53 मौजे असदुल्लाबाग येथील आहे. 1981 मध्ये या बेघर पत्रकारांनी पत्रकार सहवास को. ऑप हाऊसिंग सोसायटी नांदेड या नावाचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त केले. आणि आम्ही गरीब पत्रकार आहोत असे दाखवून त्या सोसायटीमध्ये प्रभाकर नानासाहेब रावके, कृष्णा चंटीदासराव शेवडीकर, भगवान रामराव कुलकर्णी, श्रीरंग धोंडीबा मांजरमकर, रविंद्र देविदासराव रसाळ, जयवंत गोपाळराव कुर्तडीकर, मिर्झा अहेमद चुगताई, केरबा पिराजी बसवंते, मारोतराव किशनराव गुमलवार, कमलाकर रामदेव जोशी, महम्मद सत्तार महम्मद आरेफ, अर्जुन हिंगोले आणि प्रतिभा रसाळ अशी नावे या सोसायटीत सदस्य दाखवलीत. सोसायटीच्या प्रमोटर यादीत ही नावे आहेत. त्यातील एक नाव खोडून दुसरे लिहिले आहे पण ते नाव वाचता येत नाही आणि त्यानंतर सुरू झाला बोगसपणे ही जमीन हडपण्याचा प्रकार.
या प्रकारामध्ये खरे तर भारतीय दंड संहितेची विविध कलमे जोडून त्याचा पुरता अभ्यास करून गुन्हा दाखल व्हायला हवा असे त्या विधिज्ञांचे मत आहे ज्यांनी माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या संचिकेचा अभ्यास केला.सोसायटीच्या कागदपत्रांमध्ये नमुद असलेली नावे पुढे बदलत गेली आणि नवीन पत्रकार तयार झाले. एका महिलेने 28 जानेवारी रोजी जाहिर प्रगटन दिल्यानंतर ही बाब समोर आली की, या बेघर पत्रकारांच्या सोसायटीमध्ये एकूण 36 भुखंड तर नक्कीच आहेत. या पत्रकार सोसायटीच्या कांही सदस्यांचे कारणामे सांगतांना एका व्यक्तीने सांगितले की, अ व्यक्तीला या सोसायटीत भुखंड देण्यात आला. जशी जमीनीची किंमत वाढली तशी या भुखंडांची किंमतही वाढली. दुर्देवाने अ हा व्यक्ती शारिरीक पिडेने ग्रासला गेला. तेंव्हा बेघर पत्रकारांमधील एका म्होरक्याने त्या आजारी पत्रकाराचा(मुळात अ हा व्यक्ती पत्रकार नव्हता तर एका वर्तमान पत्राचा जाहिरात आणि वसुली अधिकारी होता.) भुखंड जवळपास 36 लाखांना विकला. त्यातील 18 लाख रुपये अ या पत्रकाराला त्या म्होरक्याने दिले आणि उर्वरीत 18 लाख आपल्या गळ्यात ओतले. अशा प्रकारे या म्होरक्याने आजपर्यंत असे 18 लाखांचे किती घोटाळे केले आहेत हे शोधण्याची गरज आहे. आता त्या अ ने सुध्दा हा प्रकार कायद्याच्या तराजूत टाकायला हवा.
प्राप्त माहितीनुसार बेघर पत्रकारांच्या या भुखंड घोटाळ्यामध्ये जेवढे कांही भुखंड होते. त्यात पहिला मालक अ असे तर तो अ ने ब ला विकला, ब ने क ला विकला, क ने ड ला विकला असा प्रकार सुध्दा या भुखंड घोटाळ्यामध्ये घडलेला आहे. प्रत्येक विक्रीमध्ये बेघर पत्रकारांच्या म्होरक्याने “दलाली’ आजच्या भाषेत कमीशन खाल्ले आहे. लोकांना आपल्या लेखणीतून धडे शिकवणारे हे बेघर पत्रकार काय-काय करतात हे पाहिल्यावर आम्ही का लेखणी हातात घेतली याची लाज सुध्दा वाटते. कारण यांच्यामुळे चांगल्या लेखणी धारकांची सुध्दा समाजात किंमत कमी झाली आहे.
जून 2021 मध्ये कॉंगे्रस पक्षाचे नगरसेवक मुन्तजीबोद्दीन यांनी महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र दिले आणि या बेघर पत्रकारांच्या 2 एकर जमीनीमध्ये  ज्या उद्देशासाठी ही जागा बेघर पत्रकारांना दिली त्या उद्देशांना काळीमा फासून तेथे कामकाज सुरू आहे. तेंव्हा त्याची चौकशी व्हावी. दरम्यान आम्ही सुध्दा या बेघर पत्रकारांच्या सोसायटीची माहिती प्राप्त केली आणि त्या संदर्भाचे वृत्तांकन लिहिले. त्यानंतर एका महिलेने 28 जानेवारी रोजी एका वर्तमानपत्रात आपल्यासोबत भुखंड विक्रीचा घोटाळा बेघर पत्रकारांनी केल्याचे जाहिर प्रगटन दिले. यावरून बेघर पत्रकारांसाठी देण्यात आलेल्या या जागेचा गैरवापर आपोआपच सिध्द झाला. मुळात 27 जानेवारी 2009 रोजी दुय्यम निबंध कार्यालय नांदेड येथे नोंदणी करून भाडे कराराद्वारे ही जागा बेघर पत्रकारांना देण्यात आली होती. त्यामध्ये कलम 7 असे सांगते की, भाडे धारकास भाड्याने दिलेल्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे भाड्याने असलेली जागा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या अथवा संस्थेच्या नावे महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय हस्तांतरीत करता येणार नाही. आपल्या लेखणीच्या दमावर मी कसे पाणी सोडले असा अट्टाहास करणाऱ्या या बहाद्दर पत्रकारांनी या 7 क्रमांकाच्या अटीला सुध्दा कचऱ्याच्या कुंडीत टाकून आपल्या भुखंडांचे हस्तांतरण केले.
या बेघर पत्रकारांच्या जागेवर आज हदगाव विधानसभा मतदार संघाचे कॉंगे्रस आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या बेघर पत्रकारांच्या सोसायटीत अनेक लोकांचे भुखंड आहेत ज्यांच्याकडे पिड्यांपासून करोडोची संपत्ती आहे. 21 वर्षानंतर आता महानगरपालिकेला जाग आली आहे आणि त्यांनी जावक क्रमांक 12187 नुसार मालमत्ता विभाग कार्यालयातून 11 फेबु्रवारी 2022 रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 81(ब)(2) नुसार नोटीस जारी केली आहे. ही नोटीस अध्यक्ष पत्रकार सहवास को.ऑप हाऊसींग सोसायटी नांदेड असा पत्ता लिहिलेला आहे. यावर आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांची स्वाक्षरी आहे. या नोटीसमध्ये आपण महानगरपालिकेच्या मालकीची आपल्या संस्थेस भाडेतत्वावर दिलेल्या जमीनीतील भाडे करारातील अटींचे उल्लंघन करून परस्पर हस्तांतरण करत असल्यामुळे आपल्या संस्थेस महानगरपालिकेच्या जमीनीतून काढून टाकण्याबाबत का आदेश देण्यात येवू नये या बाबतची स्पष्टीकरण नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत माझ्याकडे सादर करावेत असे लिहिले आहे. तसे न केल्यास कलम 81 (ब) (1) नुसार पुढील आदेश पारीत करण्यात येईल अशी नोंद घेण्यास सांगितले आहे.
बेघर पत्रकारांच्या सोसायटीचा अध्यक्ष कोण ?  आता ही नोटीस तामील करणाऱ्याला शोधावे लागेल. तो माणुस शोधल्यावर सुध्दा त्याने नोटीस घेतली नाही तर नवीन कार्यवाही करावी लागेल. आमच्याकडे असलेल्या संचिकेमध्ये असे एक पत्र सुध्दा जोडलेेले आहे. ज्यामध्ये मनपाच्या कर्मचाऱ्याने लिहिलेले आहे की, अध्यक्षाने नोटीस घेण्यास नकार दिला. भारतीय लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ अशी एक ख्याती प्राप्त असलेल्या या महाभागांना खरे तर जागतीक स्तरावरील नोबेल पुरस्कार मिळायला हवा असे आता आम्हालाही वाटत आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.