नांदेड(प्रतिनिधी)-भोकर तालुक्यातील डोरली शिवारात दोन जणांना थांबवून त्यांच्याकडील 86 हजार 773 रुपये रोख रक्कम आणि 41 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला आहे. तिरुमला सुपर मार्केट येथे चोरू करून 45 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्र्वर नगर येथून 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. साईदत्तनगर मंगल कार्यालय सिडको येथून 35 हजार रुपये किंमतीचा ऍटो चोरीला गेला आहे.
सुशांत लिंबाजीराव गोमसाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 फेबु्रवारी रोजी दुपारी 12.30 वाजता ते आणि त्यांचा एक सोबती सुनिल यांनी वरदडा तांडा व वाई येथून फायनान्सची वसुली केलेली रक्कम घेवून दुचाकी क्रमांक एम.एच.38 यु.8549 वर बसून मुदखेडकडे जात असतांना डोरली शिवाराच्या रस्त्यावर तीन दरोडेखोरांनी आपली दुचाकी गाडी रोडजवळ उभी करून त्यांना तलवारीचा धाक दाखवून थांबायला लावले आणि त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा 1 लाख 27 हजार 773 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. भोकर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 43/2022 दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक तांबोळी हे करीत आहेत.
व्यंकट गोविंदराव थडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 फेबु्रवारी ते 9 फेबु्रवारीच्या रात्री अंबिका मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या तिरुमला सुपर मार्केटचे शटर अर्धवट उचलून कोणी तरी चोरट्यांनी रोख रक्कम आणि खाद्य साहित्य असा 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दालख केला आहे. पोलीस अंमलदार बोरकर अधिक तपास करीत आहेत.
बाबू विठ्ठलराव बोडके रा.पोखर्णी ता.बिलोली हे 3 फेबु्रवारी रोजी संत ज्ञानेश्र्वर नगर येथे आले होते. त्यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.झेड. 3707 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी संत ज्ञानेश्र्वर नगरात उभी केल्यानंतर चोरीला गेली. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार मंगनाळे हे करीत आहेत.
गंगाधर रतन दळवे यांनी आपला ऍटो क्रमांक एम.एच.26 एन.1910 हा 7 फेबु्रवारी रोजी दुपारी 12 वाजता साईदत्त मंगल कार्यालय एमआयडीसी सिडको येथे उभा केला होता. 15 मिनिटातच त्यांचा ऍटो चोरीला गेला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
