नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या निष्नात आणि अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षकांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तीन फेबु्रवारी रोजी आनंदनगर चौकातील मटका जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या 7 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जुगारच्या ठिकाणावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 13 हजार 810 रुपये असा ऐवज जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस हवालदार संजय विश्र्वनाथ केंद्रे यांनी आपल्या सहकारी पोलीस अंमलदारांसह 3 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास आनंदनगर चौक भागात ठाकरे कॉम्प्लेक्समध्ये छापा टाकला. तेथे मटका हा जुगार सुरू होता. पोलीसांनी येथे श्रावण गणेशराव इंदुरकर (32)रा.चौफाळा मंडई, अक्षय उमाकांत ठाकरे (26) रा.ठाकरे कॉम्प्लॅक्स, अमोल बालाजी जाधव (24) रा.मोहम्मद अली रोड इतवारा, अजय प्रल्हासिंह ठाकूर (21) रा.गोविंदनगर, दिलीप धोंडीबा पांडलवार (48), रा.हनुमानगड, आणि लक्की मिलवाले तसेच या जागेचा मालक अशा सात जणांची नावे या तक्रारीत लिहिलेली आहेत. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 45/22 कलम 4 आणि 5 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार नागरगोजे हे करीत आहेत.
