

नांदेड(प्रतिनिधी)-बॉयो मेडिकल वेस्ट (जैविक कचरा) मनपा गाडीत टाकून सार्वजनिक व्यक्तींच्या आरोग्यास गंभीर धोका तयार करणाऱ्या डॉक्टर्सलेन भागातील विश्वप्रयाग या रुग्णालयास मनपाने 10 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी पाठवलेल्या माहितीनुसार 31 जानेवारी रोजी मनपाच्या कचरा जमा करणाऱ्या घंटागाडीत डॉक्टर्सलेनमधील विश्र्वप्रयाग हॉस्पीटलने जैविक कचरा टाकला. सर्वसामान्य नागरीकांच्या आरोग्याला यामुळे धोका होवू शकतो. ह्या बाबीवर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपायुक्त शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, क्षेत्रीय अधिकारी डॉ.रईसोद्दीन, स्वच्छता निरिक्षक राजेंद्र गंदमवार, वासीम तडवी, मोहन लांडगे व मनपाच्या इतर कर्मचाऱ्यांनी विश्र्व प्रयाग या हॉस्पीटलकडून 10 हजार रुपये दंड वसुल केला आहे.
जगाला आरोग्याचा धडा शिकवणारे डॉक्टर्स आणि डॉक्टरांपेक्षा जास्त तोऱ्यात वागणारे दवाखान्यातील कर्मचारी अशा प्रकारे जैविक कचरा टाकण्याची पध्दत,त्याला नष्ट करण्याची माहिती असतांना असे कृत्य करतील तर सर्वसामान्य नागरीकाने कोणाकडून पाठ शिकला पाहिजे. हा प्रश्न समोर आला आहे. महानगरपालिकेने सुध्दा आवाहन केले आहे की, जैविक कचरा दररोजच्या घंटागाडीत किंवा सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर टाकू नका नसता त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल.