नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील शांतीनगर भागात डिटोनेटरचा स्फोट घडला आणि त्याला विविध रंग देण्यात आले. याप्रकरणात डिटोनेटर आणून शांतीनगरच्या घरात ठेवणाऱ्या व्यक्तीला इतवारा पोलीसांनी आज दि.20 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता ताब्यात घेतले आहे.
दि.13 जानेवारी रोजी इतवारा पोलीसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार शांतीनगर भागात एका घरात स्फोट झाला. या बद्दल पोलीसांनी माहिती घेतली असता 8 जानेवारी रोजी स्फोट झाला होता ही माहिती समोर आली. या घटनेनंतर डिटोनेटर कोणाला मारण्यासाठी आणले होते, डिटोनेटर वापरून बॉम्ब तयार होत होता असे आक्षेप घेत त्याबद्दलचे वृत्त प्रकाशीत झाले. इतवारा पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 13/2022 कलम 286, 34 भारतीय दंड संहिता आणि भारतीय हत्यार कायदा नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला होता.
इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांनी तयार केलेला एक गुन्हा प्रगती अहवाल त्यामध्ये मात्र असा कोणताही प्रकार लक्षात आला नाही की, ज्यामुळे हा डिटोनेटर स्फोट हा कोणा इजा पोहचविण्यासाठी नव्हता तसेच त्यात कांही गैर कृत्य करावे म्हणूनच डिटोनेटर स्फोट घडवला गेला असे कांही नव्हते. मुळात डिटोनेटर हे बल्पसारखे दिसत होते म्हणून दिपक दिगंबर धोंगडे यांनी तो डिटोनेटर विद्युत उपकरणात लावला आणि त्याचा स्फोट झाला. स्फोट झालेल्या डिटोनेटर शिवाय पोलीसांनी तेथून 10 डिटोनेटर जप्त केले. स्फोट घडला तेंव्हा दिपक दिगंबर धोंगडेला अटक झाली. पोलीसांना गुन्ह्याच्या प्रगतीमध्ये डिटोनेटर त्या घरात आणून ठेवणारा केशव शिवाजी पवार पकडायचा राहिला होता.
काल दि.19 जानेवारीच्या रात्री इतवारा भागातील रात्रीच्या गस्त पथकात सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.जी. कासले, पोलीस अंमलदार हबीब चाऊस, ज्ञानेश्र्वर कलंदर आणि सय्यद यांनी केशव शिवाजी पवार रा.परभणी यास 20 जानेवारीच्या पहाटे ताब्यात घेतले आहे. डिटोनेटर स्फोटानंतर नांदेड शहरात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांचे गणित केशव पवारच्या अटकेमुळे समोर येतील आणि कोण खरे हे ठरेल. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी इतवारा पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
