नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी अर्बन मल्टीस्टेट के्रडीट सोसायटीला दिलेला धनादेश न वठल्यामुळे गौतम नरसींगदास हिरावत उर्फ गौतम जैन याच्याविरुध्द न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी त्या अटक वॉरंटची बजावणी केली आहे. आज गौतम जैनला न्यायालयात हजर केले जाणार आहे. गौतम जैनकडे सोसायटीचे 1 लाख 38 हजार 86 रुपये देणे बाकी आहे.
नांदेड येथील गोदवरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीकडून गौतम नरसींगदास हिरावत उर्फ जैन यांनी 7 जानेवारी 2015 रोजी 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर पुढे त्यांनी सोसायटीमध्ये पैसेच भरले नाहीत. अखेर एकदा जवळपास 76 हजार रुपयांचा धनादेश सोसाटीला दिला. पण तो धनादेश बॅंकेकडे फंड उपलब्ध नाही म्हणून परत केला. त्यानंतर सोसायटीच्या व्यवस्थापकांनी परक्राम्य संकीर्ण अभिलेख (एनआय ऍक्ट) कलम 138 प्रमाणे कायद्याच्या सर्व प्रक्रिया पुर्ण करून नांदेड न्यायालयात आपल्या पैसे वसुलीसाठी ताबा क्रमांक 202/2018 दाखल केला. या खटल्यात गौतम जैन हजर राहिला नाही म्हणून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्या विरुध्द अटक वॉरंट जारी केले.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार व्ही.एन.देवकत्ते आणि त्यांचे सहकारी मनोज राठोड यांनी काल दि.19 जानेवारी रोजी गौतम जैनला ताब्यात घेतले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी गौतम जैनकडे सोसायटीचे 1 लाख 38 हजार 86 रुपये येणे बाकी आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नदीम मुदस्सर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
