

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षकांच्या गुप्त पत्राच्या आधारावर नांदेडचे अपर जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी 19 जानेवारीच्या सकाळी 6 वाजल्यापासून 2 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यं त महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 67(1)(3) नुसार जमा बंदी व शस्त्रबंदी लागू केली आहे.
अपर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या एका अधिसुचनेनुसार नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी एका गुप्त पत्राआधारे 17 जानेवारी रोजी त्यांनी पुढील कालखंडात तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन, 28 जानेवारी रोजी लाला लाचपतराय जयंती या बाबींना लक्षात घेता ओमीक्रॉन व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव या अनुषंगाने विविध ठिकाणी होणारी मोठी लोकांची संख्या नियंत्रीत व्हावी म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे जमाव बंदी व शस्त्रबंदी लागू करावी अशी विनंती केली होती.
त्याला अनुसरून नांदेडचे अपर जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी 19 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी लागू केली आहे. त्यानुसार कोणतेही शस्त्र, बंदुका, तलवारी, सोटे, सुरे, लाठ्या-काठ्या आणि शरिरात इजा करण्यास वापरता येईल अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगता येणार नाही. कोणतेही शारक पदार्थ, कोणतेही स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेत किंवा प्रतिमा किंवा आकृती यांचे प्रदर्शन करता येणार नाही. सार्वजनिकरीतेने घोषणा देता येणार नाहीत. सार्वजनिक रित्या गाणी म्हणता येणार नाहीत. वाद्य वाजवता येणार नाही, शासनाच्या विरुध्द कोणतीही कृती करून त्याचे प्रदर्शन करता येणार नाही. या परिस्थितीमध्ये जारी करण्यात आलेली ही अधिसूचना पोलीस अधिक्षकांनी दवंडीद्वारे, ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वसामान्य माणसाला माहिती होईल अशा प्रकारे प्रसिध्द करावी असे या अधिसुचनेत लिहिले आहे.