

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथील एका पोलीस अंमलदाराने 14 हजार रुपयांची लाच मागणी केली पण लाच स्विकारली नाही. या संदर्भाने भोकर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदाराविरुध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ती कार्यवाही अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
5 जानेवारी 2022 रोजी पोलीस अंमलदार रघुनाथ दिगंबरराव वानखेडे (57) वर्ष बकल नंबर 1767 याने लाच मागणीची पडताळणी केली असता तक्रार देणाऱ्या बिल्डींग मटेरियल सप्लायर कडून त्याचे टिपर वाहन चालविण्याकरीता 3 हजार रुपयांची लाच घेतल्याची कबुली दिली. तसेच 13 हजार रुपये साहेबांचे व एक हजार रुपये स्वत:साठी लाचेची मागणी केली. या संदर्भाने अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधिक्षक अरुण साावंत, अमरावतीचे घटकप्रमुख पोलीस उपअधिक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक संतोष इंगळे, पोलीस निरिक्षक अमोल कडू, पोलीस अंमलदार युवराज राठोड, विनोद कुंजाम, निलेश महिंगे आणि सतिश किटोकले यांनी ही सापळा कार्यवाही नियोजित केली होती. परंतू भोकरचे पोलीस अंमलदार रघुनाथ दिगंबरराव वानखेडे यांना संशय आल्याने त्यांनी ती लाच मागणीतील 14 हजार रुपये रक्कम स्विकारली नाही. त्यामुळे आज 17 जानेवारी रोजी भोकर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार रघुनाथ दिगंबर वानखेडे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या बाहेरील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने नांदेड जिल्ह्यात केलेली ही कार्यवाही बऱ्याच प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आवश्यक आहे.