चोरीच्या रक्कमेतील 3 लाख रुपये जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-24 डिसेंबर रोजी 6 लाख 50 हजारांची बॅग चोरून पळ काढलेल्या चोरट्यांना गुजरात राज्यातून नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडून आणले आहे. नांदेडची स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यात गुन्हेगारांवर नियंत्रण करण्याचे काम क्रमांक 1 वरच करते हे यामुळे समोर आले आहे. पोलीसांनी चोरीतील 3 लाख रुपये सुध्दा जप्त केले आहेत. 21 दिवसांत रोख रक्कमेसह चोरट्याला पकडून जवळपास अर्धी रक्कम जप्त करणाऱ्या नांदेड स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
दि.24 डिसेंबर रोजी राजकुमार द्वारकादास मुंदडा रा.मगनपुरा नांदेड हे व्यापारी डॉक्टर्सलेन परिसरातील एचडीएफसी बॅंकेतून 6 लाख 50 हजार रुपये काढून बाहेर निघाले. आपल्या दुचाकी गाडीच्या डिक्कीत रोख रक्कम ठेवली आणि सोमेश कॉलनी वजिराबाद येथे आपल्या मामाच्या घरी पोहचले. ही वेळ दुपारी दीड वाजेची होती. राजकुमार मुंदडा हे मामाच्या घराबाहेर बोलत उभे असतांना त्यांचे लक्ष दुचाकीकडे नाही हे पाहुन मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील 6 लाख 50 हजार रुपये रोख रक्कमेची बॅग काढून पळून गेले. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 461/2021 कलम 379, 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल झाला.
जिल्ह्यातील कोणत्याही गुन्ह्याचा तपास समांतर पध्दतीने करण्याचा अधिकार प्राप्त असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या 6 लाख 50 हजार रुपये चोरीच्या घटनेला गांभीर्याने घेतले. चोरी झाली त्या भागातील अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. सोबत इतर माहिती जमा केली आणि पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे आणि कांही पोलीस अंमलदार गुजरात राज्यात पाठवले. गुजरात राज्यातील अहमदाबाद गावातून या पोलीस पथकाने सिसोदीया उर्फ मुन्ना जयसिंग राठोड (52) धंदा ऍटो चालक रा.कुबेरनगर, छारानगर, फ्रि कॉलनी अहमदाबाद आणि रविंद्र बच्चु इंद्रेकर (55) धंदा बेकार, रा.अहमदाबाद गुजरात या दोघांना पकडले. या दोन चोरट्यांनी राजकुमार मुंदडा यांच्या चोरलेल्या रक्कमेतील तीन लाख रुपये पोलीसांना काढून दिले आहेत ते पोलीसांनी जप्त केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे करणार आहेत. या चोरट्यांनी बॅंकेतून पैसे काढतांना राजकुमार मुंदडाला हेरले आणि त्यांचा पाठलाग करून ती 6 लाख 50 हजारांची बॅग चोरली.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार बालाजी तेलंग, संजय केंद्रे,रुपेश दासरवाड, बालाजी यादगिरवाड,राजेश सिटीकर, महेशा बडगू आणि गणेश धुमाळ यांचे कौतुक केले आहे. एखाद्या घटनेबद्दल पोलीसांना त्या घटनेचा छडा लावायचाच आहे असे ठरवल्यानंतर पोलीस त्या घटनेचा छडा लावतातच हे या चोरट्यांना पकडल्यावर सिध्द झाले आहे. स्थानिक गुन्हा शाखेने गुजरात राज्यातून चोरी केलेल्या रक्कमेतील कांही रक्कमेसह दोन चोरटे पकडून आणले आहेत ही नक्कीच प्रशंसनिय घटना आहे.
