नांदेड(प्रतिनिधी)-आमच्या घरात तुझ्या शेळ्या का आल्या असे भांडण करून दोन भाऊ आणि त्यांच्या आईने मिळून एका 55 वर्षीय माणसाचा खून केल्याचा प्रकार भोपाळवाडी ता.लोहा येथे घडला आहे. पकडलेल्या दोन आरोपींना लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाल गायकवाड यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सलमान अब्दुल रहेमान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 जानेवारी रोजी पहाटे 4.30 वाजेच्यासुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या शेख शब्बीर शेख सरवर (19) आणि शेख समीर शेख सरवर (21) या दोन भावांनी आपल्या आईसोबत मिळून त्यांचे वडील अब्दुल रहेमान मौलासाहेब पठाण(55) यांना तुझ्या शेळ्या आमच्या घरात का आल्या असे सांगून भांडण केले आणि लोखंडी रॉडने अब्दुल रहेमान यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला. या तक्रारीनुसार उस्माननगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 5/2022 कलम 302, 323, 504, 506 आणि 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकत्ते यांच्याकडे देण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच ज्ञानेश्र्वर देवकत्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खून करणारे दोन भाऊ शेख शब्बीर शेख सरवर आणि शेख समीर शेख सरवर यांना अटक केली. आज 14 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले. खूनाच्या गुन्ह्यात तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता मांडली. लोहा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाल गायकवाड यांनी या दोन मारेकऱ्यांना पाच दिवस अर्थात 19 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
