नांदेड(प्रतिनिधी) -देशी दारु विक्रीचे पैसे घेवून जाणाऱ्या मॅनेजरला शस्त्राच्या धाकावर लुटल्याचा प्रकार करडखेड देगलूर रस्त्यावर घडला आहे. कांही चोरट्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नरंगल येथून साहित्य चोरले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये मिळून 1 लाख 13 हजार 810रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
सायलू पिराजी कडलवार हे करडखेड येथे गवंडगावकर यांच्या देशी दारु दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात. दि.12 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता दिवभर देशी दारु विकून जमा झालेले पैसे घेवून ते आपल्या दुचाकीवरुन देगलूरकडे येत असतांना जय मल्हार धाब्याजवळ कांही चोरट्यांनी त्यांना अडवून त्यांना खाली पाडले. त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून रोख रक्कमेची बॅग 62 हजार 810 रुपयांची आणि 1 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 63 हजार 810 रुपयांचा ऐवज लुटला. देगलूर पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 19/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 341 आणि 34 नुसार दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक परगेवार अधिक तपास करीत आहेत.
जिल्हा परिषद शाळा नरंगल ता.नायगाव येथील मुख्याध्यापक माधव तानाजी मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.10 जानेवारीच्या दुपारी 3 ते 3.30 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे सहकारी शिक्षक शाळेच्या दरवाजा आडवा करून जेवणासाठी गेले. असतांना कोणी तरी चोरट्यांनी शाळेतील टी.व्ही. व इतर साहित्य असा 20 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. नायगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 3/2022 कलम 380 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वळण रस्त्यावर 30 डिसेंबर रोजी चोरीला गेलेल्या दुचाकीचा गुन्हा 12 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला आहे. धनाजी बाबूराव इंगोले यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.डब्ल्यू 9533 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी 30 डिसेंबर रोजी रात्री 8.45 ते 9 अशा 15 मिनिटाच्या वेळेत चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा 12 जानेवारी रोजी दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार पांचाळ हे करीत आहेत.
