नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत अल्पावधीत आपले नाव गरुडाच्या भरारीप्रमाणे उंच नेणाऱ्या नांदेड जिल्ह्याचे भुमिपूत्र असलेल्या डॉ.हनुमंत संग्राम धर्मकारे यांचा काल दि.11 जानेवारी रोजी उमरखेड शहरात असंख्य लोकांच्या साक्षीत खून झाला. पण अद्याप उमरखेड पोलीसांना या खूनाचे कांही धागेदोरे हस्तगत झाले नाहीत. उमरखेड तालुक्यात सर्वांच्या आवडीचा डॉक्टर असलेल्या धर्मकारे यांचा खून वेगवेगळ्या विचारांना समोर आणत आहे.
नांदेड जिल्ह्यातील बोरगाव (थडी) ता.बिलोली येथील संग्राम धर्मकारे हे एस.टी.विभागात वाहक पदावर कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी अशी अपत्ये आहेत. त्यातील दोन मुले आणि एक मुलगी डॉक्टर आहे. आणि एक मुलगा मेडिकल व्यवसायीक आहे. आपल्या जीवनात मेहनत करून संग्राम धर्मकारे यांनी आपल्या मुलांना अत्यंत सुदृढ बनवले. त्यातील डॉ.हनुमंत धर्मकारे हे वैद्यकीय पदवीधर झाले आणि त्यांनी बालरोग तज्ञ अशी पदव्युत्तर शिक्षण पुर्ण करून वैद्यकीय सेवेला सुरूवात केली.
त्यांची पहिली नियुक्ती नांदेड जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून होती. मागील दहा वर्षापुर्वी त्यांची बदली उमरखेड शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झाली. तेथे त्यांनी आपला छोटाशा खाजगी दवाखाना पण सुरू केला. सध्या त्यांनी घेतलेल्या भुखंडावर बांधकाम सुरू आहे. दि.11 जानेवारी रोजी ते सकाळी सरकारी रुग्णालय उमरखेड, पोफाळी रस्ता येथे आहे. 2 वाजता ते जेवणासाठी घरी गेले. पुन्हा परत आले. त्यानंतर 4.30 वाजेच्यासुमारास त्यांच्या खाजगी रुग्णालयात रुग्ण आल्याचा कॉल आला. तेंव्हा त्यांनी आपल्या सहकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चहा घेत होते. सरकारी अधिकाऱ्यांनी कॉल येत आहे तर जा असे सांगितले.
ते कॅन्टीनच्या बाहेर आले त्यावेळी त्यांच्यासमोर एक माणुस कोणाला तरी फोनवर बोलत होता. त्याने फोनचे बोलणे अर्धवट ठेवून डॉ.धर्मकारे यांच्याकडे वळला आणि विचारले आपण डॉ.धर्मकारे काय? डॉक्टरांनी हो असे उत्तर दिले. तेवढ्यातच त्याने पिस्तुल काढले आणि डॉक्टरांच्या छातीत एक गोळी झाडली. जखमी डॉक्टर खाली पडले तेंव्हा त्यांच्या पाठीत तीन गोळ्या झाडल्या. या घटनेच्यावेळी असंख्य लोक हजर होते. त्यातील एका वयोवृध्द माणसाने मारेकऱ्यावर दगड फेकला. तो दगड लागल्याने पिस्तुलाचे मॅगझीन खाली पडले. तरीपण मारेकऱ्याने पडलेले मॅगझीन उचलून तयारच असलेल्या दुचाकीवर बसून पळ काढला. हा मारेकरी दुचाकीवर महागाव रस्त्याकडे पळाला अशी माहिती सांगण्यात आली.
सरकारी दवाखाना ते महागाव रस्ता यावर बरीच दुकाने आहेत, कार्यालय आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर सीसीटीव्ही उपलब्ध असतील तरी आज वृत्तलिहिपर्यंत या घटनेसंदर्भाने कोणताही धागादोरा उमरखेड पोलीसांच्या हाती लागला नाही अशी माहिती सांगण्यात आली. डॉ.हनुमंत धर्मकारे यांची वाढती प्रगती कोणाला दुखली काय, सर्वसामान्य माणसापासून ते उच्च पदस्थ लोकांकडे त्यांचा वाढलेला भाव कोणाला खुपला काय, त्यांनी घेतलेल्या भुखंडाबाबत कोणाचा कांही आक्षेप होता काय, त्यांची बदली उमरखेडहून दुसरीकडे कोणी करायला लावली होती. या सर्व घटनाक्रमाला पोलीसांनी संशयाच्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे.
डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. डॉ.हनुमंत धर्मकारे यांचे पार्थिव नांदेडच्या शासकीय रुग्णालयात सध्या आहे. त्यांचे कुटूंबिय मृतदेह ताब्यात घ्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. तरीपण घडलेला प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. भारताच्या प्रगतीमध्ये अशाच घटना बाधा ठरतात आणि त्याचा उद्रेक एका वेगळ्याच प्रकारे होता हे दिसते.
