

नांदेड,(प्रतिनिधी)- मागील चार वर्षापूर्वी पासून श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड येथे सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनची रितसर शाखा कार्यान्वित आहे.
सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व श्री रेणुकादेवी संस्थानचे स्थानिक अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव आणि सचिव कॉ.अरुण घोडेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापूर्वी दि. २७ ते ३१ जानेवारी २०२० मध्ये माहूर गडावर रेणुका मातेच्या पायथ्याशी युनियनच्यावतीने बेमुद्दत बैठा सत्याग्रह करून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते.तेव्हा संस्थानचे सचिव अभिनव गोयल (भा.प्र.से.) यांनी संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड व स्थानिक अध्यक्ष कॉ.श्रावण जाधव यांच्या नावाने पत्र काढून लेखी आश्वासन दिले होते. दि.१६ फेब्रुवारी २०२० रोजीच्या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना पूर्व लक्षी प्रभावाने नियमित वेतन श्रेणीवर कायम स्वरूपी नियुक्ती पत्र देण्याचे मान्य केलेले आहे.तसेच दि.१६ फेब्रुवारी रोजी श्री रेणुका देवी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत युनियन प्रतिनिधी म्हणून कॉ.गंगाधर गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले होते. वेतन श्रेणी व कायम आदेश काढण्याच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल व युनियनने श्री रेणुका देवी संस्थानाच्या व्यवस्थापनास सहकार्य करावे अशी सुचना संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा.दिपक घोलकीया यांनी केली होती. तसेच दर तीन महिन्याला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन युनियनच्या प्रतिनिधीसह बैठक घेण्यात येईल असे तोंडी बोलून स्पष्ट केले होते. परंतु २२ मार्च २०२० रोजी पासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊनची अंमलबजावणी सुरू झाल्याने व संस्थानातील सर्व कर्मचाऱ्यांना कोराना काळात कोविड सेंटरवर काम लागल्यामुळे कायम आदेश देणे व इतर कामे राहून गेली आहेत. अत्यंत तुटपुंज्या पगारावर मागील अनेक वर्षापासून चोख कर्तव्य बजावणा-या कर्मचाऱ्यांच्या राहिलेल्या मागण्या व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे.दिनांक ०६ फेब्रुवारी २०२१ व दि.०५ जून २०२१ रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीतील मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून दि.१ फेब्रुवारी २०२२ पासून वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा. तसेच रिक्त असलेले व्यवस्थापक व सुरक्षा अधिकारी पदे तात्काळ भरण्यात यावीत. या प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या करण्यात येणार आहेत.
दि.१० जानेवारी पासून सुरू होणाऱ्या बेमुद्दत सत्याग्रहात मागे दोन वर्षापूर्वी झालेल्या आंदोलनात कर्मचाऱ्यांचे कुटुंबातील सदस्य आणि अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते देखील सामील झाले होते.