नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.7 जानेवारी रोजी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जिल्ह्यातील 32 वाळू घाटांची जबाबदारी तीन तहसीलदारांवर दिली. त्याच्या आदल्यादिवशी नांदेडच्या तहसीलदारांनी 27 डिसेंबर रोजी पकडलेली एक अवैध वाळूची गाडी सोडून देण्याचे पत्र नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील अत्यंत कर्तव्य कठोर पोलीस निरिक्षक यांच्या नावे जारी केले आणि ती गाडी 7 जानेवारी रोजी सोडून देण्यात आली.
दि.27 डिसेंबर रोजी रात्रीला 2 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे यांनी एक ट्रक क्रमांक टी.एस.16 यु.सी.7714 पकडले. मुळात हा ट्रक चुकीच्या दिशेने येत होता. परंतू तपासणी केली असता त्यामध्ये ट्रक फाळक्याच्यावर पर्यंत वाळू भरलेली होती. या गाडीचा चालक माधव साईनाथ मेडेवार हा होता. या गाडीचा मालक मिलिंदराज जळबाजी सोनकांबळे मुळ रा.बारुळ कौठा, ह.मु.खानापूर निजामाबाद-तेलंगणा हा आहे. या ट्रकमध्ये येसगी येथे भरून आणलेली लाल वाळू होती. त्याच्याकडे असलेला गौण खनिज परवाना हा खुप जुना होता आणि त्याला दिलेल्या मुदतीच्या बाहेर गेला होता.
या संदर्भाने माणिक हंबर्डे यांनी 27 डिसेंबर रोजी जावक क्रमांक 6848/2021 नुसार नांदेड तहसीलदारांना पत्र दिले आणि वाहन चालक व वाहन मालकाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या अर्जानंतर तहसीलदार कार्यालयातून कोणीही व्यक्ती त्या ट्रकच्या तपासणीसाठी आला नाही. या ट्रकमध्ये जवळपास 12 ते 14 ब्रास लाल वाळू भरलेली होेती. यानंतर अचानकच 7 जानेवारी 2022 रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातून ही लाल वाळू भरलेली ट्रक सोडून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा मागोवा घेतला असता तहसील कार्यालयातील गौण खनिज शाखेच्यावतीने क्रमांक 2022/गौ.ख./ अवैध वा./का.वि दि.6 जानेवारी 2022 चे पत्र वाचायला मिळाले. या पत्रात विषय ट्रक क्रमांक टी.एस.16 यु.सी.7714 हे वाहन सोडणे बाबत असा लिहिलेला आहे. यात संदर्भ आपले पत्र दि.27 डिसेंबर 2021 असे लिहिलेले आहे. दुसऱ्या संदर्भात मिलिंदराज जळबाजी सोनकांबळे रा.नांदेड यांचा अर्ज दि.6 जानेवारी 2022 असा लिहिलेला आहे. या ट्रकच्या कागदपत्रांची पाहणी केली असता छत्तीसगड येथील रॉयल्टी पेड अभिवाहन पास पावती तपासली असता अर्जदार यांच्या नावे गौण खनिज वाहतूकीची पावती आहे. आपल्या कार्यालयाची कार्यवाही पुर्ण करून सदर वाहन मालकांच्या ताब्यात द्यावे असे या पत्रात लिहिलेले आहे. या पत्राची एक प्रत मिलिंदराज जळबाजी सोनकांबळे यांना पण देण्यात आली आहे.
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या नेतृत्वात तहसीलदार नांदेड यांची अत्यंत जलदगती कार्यवाही लक्ष देण्यासारखी आहे. 27 डिसेंबरच्या पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे यांच्या पत्रावर कार्यवाही झालीच नाही. पण मिलिंदराज सोनकांबळेच्या 6 जानेवारी 2022 च्या पत्रावर त्याच दिवशी कार्यवाही झाली. एकीकडे अवैध वाळू घाट सांभाळायचे आहेत आणि छत्तीसगड राज्याची पावती नांदेडला ग्राह्य कशी होते हा एक संशोधनाचा विषय या ट्रक सोडल्याच्या जबरदस्ती कार्यवाहीने समोर आला आहे.
