नांदेड (प्रतिनिधी)-कोराणा काळात शाळा बंद असल्यामुळे खिचडी शिजविणारे कामगार मोठ्या अडचणीचा सामना करीत आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.
आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे परंतु राज्य शासन शालेय विद्यार्थ्यांना कोरडे अन्न (ड्राय फूड, बिस्किटे) देण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे शालेय पोषण आहार कामगार संताप व्यक्त करीत आहेत.
त्या अनुषंगाने जिल्हाभर मेळावे व बैठका घेऊन नवीन निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येत आहेत.सीटूचे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये किनवट येथील जिल्हा परिषद शाळेत दि.२ जानेवारी रोजी मेळावा घेण्यात आला आणि पुढील एक वर्षासाठी शा.पो.आ. किनवट तालुका कमिटी सर्वांनुमते निवडण्यात आली आहे.
मागील पंधरा वर्षापासून शाळेत खिचडी शिजविणा-या कामगारांना अगदी तुटपूंजे मानधन मिळते आहे.
सीटू संलग्न शा.पो.आ. संघटनेच्या नेतृत्वाखाली कामगारांनी जिल्हा परिषद,हिवाळी अधिवेशन नागपूर,शिक्षण संचालक कार्यालय पुणे व मुंबईच्या मंत्रालयावर अनेक मोर्चे आंदोलने केली आहेत.
पुढील रणनिती व मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली असून सर्वानुमते नूतन तालुका कमिटी निवडण्यात आली आहे. त्या कमिटी मध्ये अध्यक्ष कॉ.दत्ता शहाणे, सचिव कॉ.दिलीप कोडापे,उपाध्यक्ष कॉ.गोपाल लष्करे,कॉ.सोनाबाई भांगे,सहसचिव यमुनाबाई सकवान, कॉ.कविता धूर्वे कोषाध्यक्ष कॉ.विश्वनाथ ढोले आदींची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या पदाधिका-यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले व पुढील कार्यासाठी जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
लवकरच शालेय पोषण आहार कामगारांच्या जीवन मरणाच्या मागण्या घेऊन नांदेड जिल्हा परिषदेवर आंदोलन करण्यात येईल असे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मेळाव्यात स्पष्ट केले आहे.
मेळावा यशस्वी करण्यासाठी सदाशिव चव्हाण,लिलाबाई सलाम,धूरपतबाई धूर्वे,निर्मला कणाके,मंगला धूमाळे,शशिकलाबाई शिरपुरे,इंदूबाई घोगेवाड,सटवाजी भांगे,ईमलाबाई ऊर्वते, कॉ,रेगनवाड आदींनी प्रयत्न केले आहेत.