क्राईम

मकोका न्यायालयाने चार जणांना तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वसंतनगर भागात असणाऱ्या रुपा गेस्ट हाऊसमध्ये शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकणाऱ्या कांही जणांना पकडल्यानंतर आज मकोका न्यायालयातील न्यायाधीश के. एन. गौतम यांनी  यातील चार जणांना 1 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शहरातील वसंतनगर भागात असणाऱ्या रुपा गेस्ट हाऊसमध्ये कांही दरोडेखोरांनी 1 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 10 वाजता बारमध्ये शिरुन शस्त्रांचा धाक दाखवून तेथे लुट केली. या प्रकरणात हजर असलेल्या आरोपींनी त्या रुपा गेस्ट हाऊस शिवाय बऱ्याच जागी लोकांची लुट केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या रुपा गेस्ट हाऊस प्रकरणासंदर्भाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 379/2021  दाखल झाला. त्यामध्ये भारतीय हत्यार कायद्याची कलमे सुध्दा जोडलेली होती.या प्रकरणात चार जणांना अटक झाली होती. त्यात अनिल सुरेश पवार उर्फ अनिल पंजाबी (22) रा.गोविंदनगर नांदेड, दमेमसिंग उर्फ पाजी जोगेंद्रसिंग चव्हाण (24) रा.सैलानी दर्गा पिंपळगाव सरई जि.बुलढाणा, शेख अझहर शेख अनवर (28) रा.सादतनगर नांदेड, शेख सलमान शेख युसूफ (20) रा.फारुखनगर अशांना अटक झाली. याप्रकरणात पोलीसांना अजूनही शेख अजहर शेख रहिमोद्दीन रा.सादतनगर हा फरार आरोपी हवा आहे. या प्रकरणाचा तपास झाला तेंव्हा या पाच नावांसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक सुध्दा यात सहभागी असल्याची तपासणी सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी केली होती.
पुढे या प्रकरणाबाबत शिवाजीनगर पोलीसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 प्रमाणे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आणि  त्यात मकोका कायदा प्रमाणे कलम वाढ करण्याची परवानगी मागितली. ती परवानगी दि.23 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त झाली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक नांदेड शहर यांच्याकडे वर्ग झाला. या प्रकरणात अनिल पंजाबी, दमेमसिंग चव्हाण, शेख अझहर आणि शेख सलमान यांना पोलीस उपअधिक्षक नांदेड शहर यांनी मकोका न्यायालयात आज दि.29 डिसेंबर रोजी हजर केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी या प्रकरणात पोलीस कोठडी देणे कसे आवश्यक आहे याचे सादरीकरण न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाने या चौघांना तीन दिवस अर्थात 1 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.