महाराष्ट्र

स्वजिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गच्छंती आता अटळ

आगामी मनपा, जिल्हा परिषदा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
नांदेड (प्रतिनिधी)-आपल्या स्वत:च्या जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि 31 मार्च 2022 पर्यंत एका जिल्ह्यात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे अधिकारी यांच्याबाबत त्वरीत निर्णय घेवून कांही दिवसांमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कर्तव्यदक्ष आणि नि:पक्ष अधिकाऱ्यांच्या हाताळणीने व्हाव्यात या संदर्भाने राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेले पत्र महाराष्ट्राच्या अनेक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. या पत्रामुळे आपल्याच जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गच्छंती अटळ आहे.
राज्य निवडणुक आयोगाने 22 डिसेंबर 2021 रोजी जारी केलेल्या पत्रानुसार अगामी काळात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या 283 पंचायत समित्या, 213 नगरपरिषदा आणि 2 हजारच्या आसपास ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेची निवडणुक सुध्दा होणार आहे. या अनुशंगाने निवडणुकांचे कामकाज करण्याकरीता योग्य अधिकारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने योग्यता उपाययोजना तात्काळ करणे आवश्यक असते. ज्यामध्ये निवडणुकांची प्रभाग रचना, मतदार यादी, प्रत्यक्ष निवडणुक आणि निवडणुकीच्या संदर्भाने विविध कामे याबाबत कांही अधिकाऱ्यांचा विशेष उल्लेख या पत्रात केला आहे.
निवडणुकाविषयी काम काज करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि नगर परिषद आणि नगर पंचायतींचे मुख्याधिकारी यांचा समावेश असतो. सोबतच निवडणुक निरिक्षक म्हणून कामकाज पाहणारे अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि त्या दर्जाचे अधिकारी या संज्ञेत येतात.
कायदा आणि सुव्यवस्था निवडणुकीत अबादीत राहावे म्हणून पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस उपमहानिरिक्षक, पोलीस अधिक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस निरिक्षक (ठाणे प्रभारी अधिकारी), सहाय्यक पोलीस निरिक्षक असे हे अधिकारी यात समाविष्ठ करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र विकास सेवा , परिवहन इत्यादी विभागातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे निवडणुक आचारसंहितेच्या अनुषंगाने संबंध येवून शकतो असे अधिकारी.
आगामी निवडणुका मुक्त आणि नि:पक्षपातीपणे तसेच पारदर्शक पार पाडण्याकरीता आणि निवडणुक प्रक्रिया कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी यांच्याद्वारे हाताळणी करीता आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक व इतर उपाययोजना करण्याकरीता राज्य निवडणुक आयोगाच्या 31 जुलै 2018 मधील आदेशांना अनुसरुन कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आगामी निवडणुका विचारात घेता वरिल सर्व संवर्गातील जे अधिकारी, कर्मचारी यांना 31 मार्च 2022 पर्यंत त्या जिल्ह्यात तीन वर्षाचा कालावधी पुर्ण होत आहे अशांचा तात्काळ आढावा घेण्यात यावा. तसेच 31 जुलै 2018 च्या आदेशातील निकषांचा विचार करून जे अधिकारी स्वगृह जिल्ह्यात नियुक्तीस आहेत. अशा अधिकाऱ्यांचा तपशील प्राप्त करून योग्यती कार्यवाही करावी.
राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हे पत्र अपर मुख्य सचिव (गृह), अपर मुख्य सचिव (महसुल), अपर मुख्य सचिव ग्राम विकास व जलसंदारण, प्रधान सचिव (2) नगरविकास मंत्रालय आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांना पाठविले आहे. यामधील मार्गदर्शन आणि सोबत 31 जुलै 2018 चा गृहमंत्रालयाचा आदेश सुध्दा जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांसाठी त्यांची गच्छंती आता अटळ झाली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.