
नांदेड जिल्ह्याचे तापमान १४ अंश डिग्री सेल्सीयस पर्यंत खाले उतरल्याने सकाळपर्यंत मतदानाचा जोर फारसा नव्हता मात्र दुपारी मतदानाला सुरुवात झाली. नायगाव येथे दुपारी साडेतीनपर्यंत ७०.८३ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडेअकरापर्यंत मतदानाची ही टक्केवारी केवळ २९.७८ टक्के एवढी होते. त्यानंतर मतदानाने वेग घेतला. नायगाव येथे १२ हजार मतदार असून, दुपारी साडेतीनपर्यंत ५ हजार ७१६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अर्धापूर येथे सकाळी मतदानाची टक्केवारी कमी होती मात्र दुपारी बारानंतर मतदारांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रावर रांगा लावल्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६५.५८ टक्के एवढे मतदान झाले आहे. १३ प्रभागासाठी ५७ उमेदवार असून, १७ हजार १०४ मतदारांनी २६ मतदान केंद्रावर दुपारी साडेतीनपर्यंत ११ हजार २१७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. माहूर येथेही सकाळी साडेनऊपर्यंत केवळ ६.८४ टक्के मतदान झाले. मात्र त्यानंतर मतदानाला वेग आला. माहूर येथे १३ प्रभागासाठी ७ हजार १०१ मतदार असून १४ मतदान केंद्रावर ६२ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व ठिकाणच्या इतर मागास प्रवर्गासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या १३ (अ) च्या पोटनिवडणुकीसाठी दुपारी साडेतीनपर्यंत केवळ २७.०१ टक्के मतदान झाले. या मतदान केंद्रावर २१ हजार ४५३ मतदार मतदानासाठी पात्र आहेत.