नांदेड

नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपल्या हक्काचा वापर योग्य व्यक्तीच्या निवडीसाठीच करावा

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, माहूर, नायगाव नगरपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. मतदारांनी आपल्या प्रभागाचे भले करणाऱ्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. नाही तर पुढील पाच वर्ष निवडुण आलेला उमेदवार तुमचे ऐकणार नाही. तुमच्या समस्यांकडे पाहणार नाही. तो आपले घर कसे भरता येईल याकडेच लक्ष देईल. मग तुम्हाला आपला मतदानाचा अमुल्य अधिकार वापरून काय मिळाले. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सुध्दा सापडणार नाही.
भारतीय लोकशाहीने संविधानात सर्वात मोठा अधिकार म्हणून प्रत्येक नागरीकाला मतदानाचा अधिकार दिला. या अधिकारानुसार आपल्या पसंतीचा उमेदवार निवडणुकीत विजयी करता यावा यासाठी या अधिकाराचा वापर केला जातो. हा वापर करतांना प्रत्येक मतदाराने त्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. कारण आपण एकदा दिलेले मतदान पुढील पाच वर्षापर्यंत बदलता येत नाही, तशी सोय भारताच्या लोकशाहीत उपलब्ध नाही. नवीन पध्दतीनुसार नोटा हा एक पर्याय आला आहे. परंतू त्यात दिल्या जाणाऱ्या मतदानाची कांही किंमत मोजली जात नाही. त्यात फक्त एवढे लोक त्या प्रभागातील प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात आहेत एवढेच कळते. खरे तर भारतीय लोकशाहीमध्ये विजयी उमेदवाराच्या तुलनेत विरोधी उमेदवारांना पडलेले मतदान मोजले तर ती संख्या विजयी उमेदवाराच्या मतसंख्येपेक्षा भरपूर जास्त होते. पण लोकशाहीमध्ये ज्या पध्दतीने निवडणुक निकाल येण्याची प्रथा आहे. त्यानुसार फक्त 30 ते 35 टक्के मतदान घेणारा उमेदवार निवडूण येतो. मतदान सुध्दा कमी होते. त्यामुळे या सर्व गणिताची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या सर्व प्रक्रियांना अभ्यासपूर्ण रितीने पाहिले तर विजयी उमेदवाराच्या विरोधात 80 टक्के लोक असतात तरीपण तो निवडूण येतो. यापेक्षा लोकशाही मुल्यांमधील मोठेे दुर्देव दुसरे असू शकत नाही.
नगर पंचायतींच्या जागांवर ज्या लोकांनी अतिक्रमण करून आपला गल्ला भरणे सुरू केले आहे. त्यांना मतदान देवू नका. कांही मंडळी आपल्या प्रभागातील नागरीकांना मी तुला यात अडकविल अशा धमक्या देवून मतदान मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना सुध्दा मतदान देवून नका चांगल्या माणसाला निवडूण द्या तर तो नक्कीच तुमच्या सोबत प्रत्येक त्रासाच्यावेळी उभा राहिल. कांही मंडळी ज्यांच्याकडे खायचे वांदे होते. ते आता गडगंज श्रीमंत झालेत. याचा शोध घ्या आणि त्यांनी ज्या पध्दतीतून गडगंज होण्याचा मार्ग निवडला ती मंडळी तुम्हाला आवडणारी असेल तर मतदान द्या नाही तर खऱ्या लोकप्रतिनिधीला मतदान द्या. खरा लोकप्रतिनिधी हाच लोकांना आपला वेळ देतो, त्यांच्या घरची समस्या आपली समजतो, आपले महत्वाचे काम सोडून जनतेच्या कामासाठी येतो तोच खरा लोकप्रतिनिधी असतो. नाहीतर निवडणूक संपली, विजय मिळाला की, जनतेला विसरणारी मंडळी लोकप्रतिनिधी असूच शकत नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.