क्राईम

जिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणातील दोन आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक;एकाला चार दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी स्वत: पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात तीन जणांना पकडण्यात आले होते. जे त्या जागेवर सापडले. यासोबत दोन जणांची नावे पोलीस प्राथमिकीमध्ये जोडून 5 जणांविरुध्द एफआयआर दाखल झाला. त्यातील दोन विधीसंघर्षग्रस्त बालक होते. त्यामुळे त्यांची रवानगी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मयुरा यादव यांनी बालसुधारगृहात केली. उर्वरीत एकाला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.देशमुख यांनी 25 डिसेंबरपर्यंत अर्थात चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
                         काल दि.20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास बाळगिर पंचमगिर यांच्या मठाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी का शटरमध्ये धाड टाकली. त्यानंतर नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक श्रीमान अशोकरावजी घोरबांड साहेब यांना बोलावण्यात आले. त्यानंतर दिपक पार्श्र्वनाथ मरळे यांनी तक्रार दिली की, या ठिकाणी बायोडिझेलचा अवैध पुरवठा करणारे, डिझेल मोजणीकरीता मशीनचा पुरवठा करणारे, जागा मालक आणि त्यांना मदत करणारे अशा आरोपींविरुध्द जीवनावश्यक/ अत्यावश्यक वस्तु अधिनियमच्या कलम 3 आणि 7 नुसार माझी कायदेशीर फिर्याद आहे. याप्रमाणे पोलीसांनी गुन्हा क्रमांक 882/2021  दाखल केला. यामध्ये अनुक्रमे 1 ते 5 जणांची नावे लिहिलेली आहेत आणि एक अनोळखी माणुस आहे. अशा 6 जणांना आरोपी करण्यात आले. या ठिकाणी 17 हजार लिटर बायोडिझेल, प्लास्टिक टाक्या आणि टॅंकर क्रमांक एम.एच.26 ए.डी.0687, डिझेल मोजमाप, करण्याचे आणि भरण्याचे दोन मशीन, पाईप, मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 26 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
                      एफआरमध्ये अनुक्रमे आरोपी 1 आणि 2 याचे वय 21 आणि 19 असे लिहिलेले आहे. तिसरा पकडण्यात आलेला आरोपी शेख अलीम शेख अब्दुल करीम  (32) धंदा मंजुरी रा.वाजेगाव हा आहे. चौथ्या आरोपीचे नाव इरफान रा.जुना गंज इतवारा असे लिहिले आहे. पाच असलम याचे पुर्ण नाव माहित नाही आणि सहावा इतर अनोळखी एक माणुस असा उल्लेख आहे. या गुन्हा क्रमांक 882 चा तपास अत्यंत  कायदेशीर काम करणारे पोलीस अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्याकडे देण्यात आला आहे.
                आज पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड साहेब,  पोलीस अंमलदार ज्ञानेश्र्वर कौठेकर, शेख रब्बानी, मलदोडे आदींनी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यात 21 आणि 19 वर्ष वय लिहिलेले आरोपी विधीसंघर्षग्रस्त बालक निघाले. त्यामुळे त्यांना विधी न्यायमंडळासमक्ष हजर करण्यात आले. विधी न्यायमंडाळाच्या अधिकारी, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मयुरा यादव यांनी त्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांची रवानगी बालसुधार गृहाकडे केली. उर्वरीत तिसरा शेख अलीम शेख अब्दुल करीम(32) रा.वाजेगाव या व्यक्तीला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.देशमुख यांनी 25 डिसेंबर 2021 पर्यंत अर्थात चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.