नांदेड

जातीवाचक शिवीगाळ करण्याचा गुन्हा 17 दिवसानंतर सुध्दा दाखल नाही

मनपा झोनल अधिकारी राजू चव्हाणने घडविला होता ऍट्रॉसिटीचा प्रकार
नांदेड (प्रतिनिधी)-महानगरपालिकेतील झोन अधिकारी राजू चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचरंगी ध्वजाचा अपमान करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार 3 डिसेंबर रोजी दिल्यानंतर सुध्दा अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.
साहेबराव विठ्ठलराव चौदंते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन्मीत्र गृहनिर्माण सोसायटीमध्ये त्यांनी 1 जून 2021 रोजी एक भुखंड खरेदी केला आणि त्या भुखंडावर पंचरंगी ध्वज उभारला. दि.3 डिसेंबर रोजी रात्री 7.35 वाजता महानगरपालिकेचे झोनल अधिकारी राजू चव्हाण आणि त्यांचे इतर सहकारी तेथे आले व साहेबराव चौदंतेच्या भुखंडावरील पंचरंगी ध्वज खाली पाडून त्यावर लाथा मारल्या. याबद्दल विचारणा करतांना राहुल सोनसळे, भगवान तारु, रमाकांत हळदे आदी हजर असतांना राजू चव्हाणने जातीवाचक शिवीगाळपण केलेली आहे.
पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे 3 डिसेंबर रोजी हा अर्ज दिल्यानंतर सुध्दा आज 20 डिसेंबर संपत आला तरी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झालेली नाही असे साहेबराव चौदंते यांनी सांगितले. याप्रकरणी ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी घेवून साहेबराव चौदंते आणि त्यांचे सहकारी आज नांदेड शहर उपविभागीय पोलीस उपअधिक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *