नांदेड (ग्रामीण)

देगलूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचा एकहाती ऐतिहासिक विजय

18 पैकी 18 जागा भाजपा प्रणित पॅनेलने जिंकल्या 
देगलूर (प्रतिनिधी) -देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार 40 हजाराचे मताधिक्य घेऊन विजयी झाल्याने देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुध्दा तिघाडीने एकत्र येऊन निवडणूक लढविली. मात्र मतदारांनी महाविकास आघाडीचा पुर्णतहा सफाया करित भाजपाच्या पॅनलला एकहाती विजय मिळवून दिला. या निवडणुकीत तिघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला तर भाजपाला आधी लढायला शिका आम्ही पाठिशी आहोत याचा संदेश मतदारांनी दिला.
दिड महिन्यापुर्वीच देगलूर विधानसभा पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी एकत्रितपणे येत निवडणुक लढविली होती त्यात कांग्रेस पक्षाचा उमेदवार 42 हजार मतांनी विजयी झाल्याने महाविकास आघाडीला नेत्यांना घमेंडी आली होती. देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा शेतकरी विकास पॅनल तर महाविकास आघाडीचा महाविकास आघाडी पॅनल उभे होते. विधानसभा निवडणूक सहज जिंकल्याने बाजार समितीची निवडणूक आघाडी सहजरीत्या जिंकेल असा आत्मविश्वास आघाडीच्या नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाला होता. उमेदवारी अर्ज भरताना सुध्दा तिघाडीच्या उमेदवारांनी सभापती व उपसभापती कोण हे ठरविले होते. एवढा अहंकार तिघाडीच्या नेत्यांना आला होता. भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार सुभाष साबणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, तालुकाध्यक्ष शिवाजी कनकंटे, रामदास पाटील सुमठाणकर, मारोती वाडेकर आदिनी नियोजनबद्ध रित्या निवडणुक लढवून प्रचारयंत्रणा राबविली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती उदय पाटील राजूरकर यांनी  प्रकृती अस्वस्थामुळे घरात बसून मतदारांशी संपर्क साधला त्याचा ही फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला हे ही नाकारून चालणार नाही. उदय पाटील राजूरकर यांचे चिरंजीव अनिकेत पाटील राजूरकर यांच्यासह अनिल पाटील खानापूरकर हे प्रमुख उमेदवार भाजपकडून विजयी झाले. कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रितम देशमुख हणेगावकर यांचा सुध्दा मतदारांनी पराभव करून अस्मान दाखविले.देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तिघाडीला भोपळा ही फोडता आला नाही. त्यामुळे तिघाडीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ मतदारांनी दिली आहे.देगलूर  बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने पॅनल उभे करून निवडणूक लढविली होती त्यात मतदारांनी भाजपाच्या पारड्यात सर्व जागा टाकल्या तर तिघाडीला भोपळा देवून त्यांना नाकारले. भाजपाचे बहुतांश उमेदवार 100 मताच्या मताधिक्याने विजयी झाले हे विशेष.
भाजपाच्या शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून शांताराम वसंतराव पळनीटकर, अनिकेत उदय पाटील राजूरकर, अनिल हणमंतराव पाटील खानापूरकर, नरसिंग गोविंदराव पाटील, मारोतीराव गोविंदराव पाटील, रमेश संजिवनराव भोसले, हणमंत संग्राम देशमुख हसनाबादे विजयी झाले तर सेवा सहकारी संस्था महिला मतदारसंघातून सिमाबाई अशोकराव पाटील, पदमीनबाई दादाराव भुताळे विजयी झाले. सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघातून रविन्द हणमंतराव पाटील तर सेवा सहकारी संस्था वि. जाती मतदारसंघातून तडखेलचे माजी सरपंच बाबू अक्येमोड हे विजयी झाले. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून पंकज शहाजीराव देशमुख करडखेडकर व शिवराज बसवंतराव पाटील हे विजयी झाले. ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातून संगिता नारायण बिरादार तर ग्राम पंचायत अनुसूचित जाती मतदारसंघातून भाजपचे जुने कार्यकर्ते विठ्ठल साधू राजकुंडल हे विजयी झाले. अडत व्यापारी मतदारसंघातून संतोष मधूकर नारलावार व गंगाधर मारोतीराव मुंडकर हे दोघे विजयी झाले तर हमाल मापारी मतदारसंघातून भाजप प्रणित अपक्ष उमेदवार लक्ष्मण कोंडेवाड हे विजयी झाले. भाजपाच्या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार खा. प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, रामदास पाटील व तालुकाध्यक्ष शिवाजी कनकंटे व जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.