नांदेड

त्रिकुट येथील गोदावरी संगमाच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा स्वयंस्फूर्त पुढाकार

नांदेड (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण भारतभर साजरा केल्या जाणाऱ्या रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमात गोदावरी नदीचा समावेश करण्यात आला आहे. यात नांदेड जवळील त्रिकुट येथील गोदावरी नदीच्या संगम स्थळी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. याअंतर्गत संगम परिसरातील स्वच्छता मोहिमेचा आज प्रारंभ करण्यात आला.
लोकसहभाग, सेवाभावी संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा यांच्या समन्वयातून गोदावरीचा हा उत्सव हाती घेतला असून यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेवून हा महोत्सव आपला केला.त्रिकुट येथील गणपती मंदिर परिसर व संगमाच्या काठावर महापूरात वाहून आलेल्या प्लास्टीक पिशव्या, उन्मळून पडलेली बाभळीची झुडपे व इतर कचरा महिलांनी स्वच्छ केला. त्यांच्या मदतीसाठी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, माता साहिब गुरुद्वारा बोर्डचे सेवेदार बाबा गुलाबसिंग खालसा, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नायब तहसिलदार मुंजाजी काकडे, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, त्रिकुट गावातील जेष्ठ नागरिक व प्रतिनिधी, विस्तार अधिकारी गोविंद मांजरमकर, महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या सदस्या, समूह संसाधन व्यक्ती सुजाता बुक्तरे, सारिका तिडके, मिनाक्षी वाघमारे, रयत सेवाभावी संस्थेचे प्राध्यापक संतोष शिंदे, नितिन गादेकर, अमोल टोमके, चंद्रकांत मेटकर, संतोष खोसळे आदीनी यात योगदान दिले.
रिव्हर्स ऑफ इंडिया या उपक्रमांतर्गत शुक्रवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 11 या कालावधीत अधिकारी-कर्मचारी, अशासकीय संस्था व ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून गोदावरी नदीच्या परिसराची स्वच्छता, सपाटीकरण व हेरीटेज वॉकसाठी रस्ता तयार करणे, याबाबत आवाहन करण्यात आले होते.नियोजनाप्रमाणे या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवार दि. 19 डिसेंबर रोजी त्रिेकुट ते मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र मॅराथॉन स्पर्धा, सोमवार 20 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा व देशभक्तीपर गीत, छायाचित्र स्पर्धा, मंगळवार 21 डिसेंबर रोजी एकात्मतेची शपथ व योगा शिबीर, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, बुधवार 22 डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य, नाटक इत्यादी स्पर्धा व महिलांच्या सहभागाने नदीपात्रात दिवे लावून दिपोत्सव आदी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्रत्यक्ष त्रिकुट येथे भेट देवून लोक सहभागाबद्दल ग्रामस्थांना आवाहन केले होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभाग, महसूल विभाग व संबंधित विभागामार्फत तयारी पूर्ण केली जात आहे.नदी स्वच्छतेसमवेत आरोग्याच्या दृष्टीनेही विविध उपक्रम नियोजित करण्यात आले आहेत. यात लसीकरणावर भर देण्यात आला आहे.डॉ.व्ही.डी.कसबे, डॉ. मारहा तन्वीर सिंह, डोईबळे, भंडारे, बंडेवार व आरोग्य सेविका शेगावकर हे लसीकरणाची प्रभावी मोहिम राबवित आहेत. या स्वच्छता मोहिमेची सांगता महाराष्ट्र गीत आणि भक्ती गीताने करण्यात आली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *