नांदेड(प्रतिनिधी)-50 हजारांची खंडणी घेतांना पोलीसांनी ताब्यात घेतलेला आरटीआय कार्यकर्ता तथा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष याला अटक होण्याअगोदर शारीरिक परिस्थिती बिघडल्याने सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील सर्वात महत्वपुर्ण बाब म्हणजे या गुन्ह्याचा तपास नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
विकासनगर कौठा येथील व्यवसायीक विकास मोहनराव आढाव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 14 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास डॉ.आंबेडकर चौक, लातूर फाटाजवळील रत्नेश्र्वरी गॅरेजमध्ये बसून आरटीआय कार्यकर्ता तथा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष विलास पुंडलिकराव घोरबांड पाटील याने विकास आढाव पाटीलकडून 50 हजारांची खंडणी स्विकारली. त्यावेळेस पंच सुध्दा हजर होते. खंडणी स्विकारताच बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक आणि त्यांच्या पथकाने विलास घोरबांडला ताब्यात घेतले. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 872/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 384 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अर्चित चांडक आणि त्यांच्या पथकाने खंडणी घेणाऱ्या विलास पुंडलिकराव घोरबांड यास ताब्यात घेतल्याबरोबर त्यांची प्रकृती बिघडली आणि सध्या त्यांच्यावर डॉ.शंकररावजी चव्हाण शासकीय रुग्णालयात शासकीय इतमामात उपचार सुरू आहेत. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी विलास घोरबांड पाटील यांना डिस्चार्ज दिल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही होणार आहे. ही कार्यवाही करण्यासाठी नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे यांनी आज नांदेडमध्ये आगमन केले आहे.
