नांदेड(प्रतिनिधी)-लग्न झाल्यानंतर दीड महिन्यात नवऱ्याचे घर सोडून प्रियकराकडे आलेल्या आपल्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला दोन भावांनी गळाचिरून खून केला होता. भोकर न्यायालयाने एकाला मृत्यूदंड आणि एकाला जन्मठेप अशी शिक्षा ठोठावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती व्ही.के.जाधव आणि न्यायमुर्ती संदीपकुमार मोरे यांनी भोकर न्यायालयाच्या शिक्षेत कोणताही बदल केला नाही. जखमी अवस्थेत ही प्रेयसी रस्त्यावर येवून मदत मागत होती पण त्यावेळी लोक तिचे व्हिडीओ आणि फोटो बनवत होते. पण तिला मदत कोणी केली नव्हती हे या समाजातील दुर्भाग्यपुर्ण चित्र नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळाले होते.
मौजे थेरबन ता.भोकर जि.नांदेड येथील युवती पुजा दासरे हिचे प्रेम लहानपणापासून मित्र असलेल्या अनुसूचित जातीतील छायाचित्रकार गोविंदर कऱ्हाळे सोबत होते. पुजा दासरेच्या कुटूंबियांना या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागली तेंव्हा दासरे कुटूंबियांनी पुजाचे लग्न भोकर येथील जेठीबा वर्षेवार या युवकासोबत 1 जून 2017 रोजी करून दिले. पण पुजाचे मन तर गोविंदमध्ये अडकलेले होते. तेंव्हा ती दीड महिन्यानंतर आपल्या नवऱ्याचे घरसोडून गोविंदसोबत कोणालाही न सांगता निघून आली. हा घटनाक्रम दासरे कुटूंबियांना कळला तेेंव्हा त्यांनी शोधाशोध केली. पुजाचा भाऊ दिगंबर दासरे आणि गोविंद कऱ्हाळे हे सुध्दा लहानपणीचे मित्र आहेत. तेंव्हा दिगंबरने थेट गोविंदला फोन करुन विचारणा केली. तेंव्हा त्याने पुजा त्याचच सोबत असल्याचे मान्य केले. पुजा कोठे आहे ही माहिती मिळाल्यानंतर 23 जुलै 2017 रोजी तेलंगणातील मुधोळ तालुक्यात दिगंबर दासरे आणि त्याचा चुलत भाऊ मोहन दासरे हे दोघे तेथे गेले आणि त्यांनी पुजाला नवऱ्याच्या घरी जाण्याची विनंती केली. पुजा कोणत्याही परिस्थिती गोविंदला सोडण्यास तयार नव्हती. तेंव्हा दोन्ही दासरे बंधूंनी दबरदस्त खलबत रचले आणि तुमचे दोघांचे लग्न आम्ही बासरमध्ये लावून देवू असे सांगून दोघांना दिवशी (बु) ता.भोकर या शिवारात आणले आणि रस्त्याच्या बाजूला नाल्यामध्ये नेऊन प्रथम गोविंदचा गळा चिरला. याप्रसंगी पुजा आपल्या प्रियकराला वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागली तेंव्हा भावांनी ती आपली बहिण आहे हे विसरुन तिचाही गळा कापला. हा घटनाक्रम सुध्दा 23 जुलै 2017 रोजी घडला.
जखमी अवस्थेत पुजा जवळ असलेल्या रस्त्यावर आली. अनेक लोकांनी तिचा गळा चिरलेला पाहिला ती लोकांना इशारा करून गोविंदला मारण्याची जागा दाखवत होती. पण लोक तिचा व्हिडीओ आणि फोटो काढण्यातच मग्न राहिले आणि त्यात तिचाही मृत्यू झाला. भोकर पोलीसांनी स्वत: पोलीस ठाण्यात हजर आलेल्या दिगंबर आणि मोहन दासरे बंधूविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 120 (ब) यासह अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल केला. भोकरचे जिल्हा न्यायाधीश शेख मुजीब यांनी या प्रकरणात 18 जुलै 2019 रोजी खटल्याचा निर्णय दिला. तेंव्हा 8 साक्षीदारांच्या जबानीमुळे आलेला पुरावा ग्राह्य मानून दिगंबर दासरेला मरेपर्यंत फाशी आणि 5 हजार रुपये रोख दंड तसेच मोहन दासरेला जन्म ठेप आणि 11 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणी दिगंबर आणि मोहन यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपील प्रकरणात सरकारी वकील ऍड. राजेंद्र डासाळकर यांनी मांडलेला युक्तीवाद असा होता की, हा ऑनर किलींगचा प्रकार आहे. आपल्या बहिणीचे नाते विसरुन आणि आपल्या लहानपणीच्या मित्राला विसरुन मारेकऱ्यांनी या दोघांचा केलेला खून म्हणजे समाजात आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठीचा प्रकार असल्याचे सांगितले. म्हणून यांची शिक्षा कायम ठेवावी अशी विनंती केली.न्यायमुर्ती व्ही.के.जाधव आणि न्यायमुर्ती संदीपकुमार मोरे यांनी भोकरच्या न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे.