

गृहरक्षक दलाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी समारोहात गृहरक्षक आणि त्यांच्या कुटूंबियांची आरोग्य तपासणी
नांदेड(प्रतिनिधी)-शिस्तीच्या जीवनात आपल्या स्वास्थाची काळजी आपण स्वत: केल्याशिवाय पुढील जीवनात येणाऱ्या समस्यांना योग्यरितीने तोंड देवू शकणार नाहीत म्हणून गृहरक्षक दलात काम करणाऱ्या प्रत्येक महिला आणि पुरूषाने आपल्या जीवनातील ताण-तणावाला मुक्ती देण्यासाठी भरपूर व्यायाम करावा, छोट्या-छोट्या रोजच्या मेहनतीची कामे करावीत. जेणे करून आपण सुदृढ राहुत तरच समाजाला आपली सेवा देण्यात सक्षम भुमिका निभावणार आहोत.तसेच कोणी गृहरक्षक बेशिस्त वागेल तर मी गय करणार नाही,असे प्रतिपादन जिल्ह्याचे अपर पोलीस अधिक्षक तथा गृहरक्षक दल समादेशक निलेश मोरे यांनी केले.
महाराष्ट्र होमगार्ड विभागाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त आज रविवारी भाग्यनगर येथे जिल्हा होमगार्ड कार्यालय येथे श्रमदान आणि गृहरक्षक तसेच त्यांच्या कुटूंबियांची आरोग्य तपासणी आणि औषोधोपचार असा कार्यक्रम गृहरक्षक दल नांदेड, स्वामी समर्थ फाऊंडेशन आणि श्री चंद्रप्रभा होमिओ क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात निलेश मोरे बोलत होते.
बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि कामाचा ताणतणाव यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी, विकार होतात परिणामी कौटुंबिक स्वास्थ्य बिघडून जाते. त्यामुळे सर्वांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या स्वास्थ्याची काळजी घेणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे समादेशक निलेश मोरे आज रविवारी येथे बोलताना केले . याप्रसंगी व्यासपीठावर प्रशासकीय अधिकारी बी.टी.शेट्टे, केंद्र नायक अरुण परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटक निलेश मोरे पुढे सांगत होते की, भारतीय प्राचिन व्यवस्थेत योग साधनेचे महत्व भरपूर आहेत. त्यातील फक्त एका कपालभाती या प्रक्रियेला दररोज केले तर जवळपास 80 प्रकारचे रोग दुर होतात. आपल्या कुटूंबीयांच्या आरोग्याची काळजी आपण घेतली नाही तर त्याचा परिणाम आपल्या कर्तव्यावर होतो. आपल्या कर्तव्यातील दम कायम राखण्यासाठी आपल्या आणि आपल्या कुटूंबियांच्या आरोग्याचे लक्ष आापण स्वत:च दिले पाहिजे. आपल्या आरोग्यात येणाऱ्या अडचणींची सुरूवात पोटापासून होते. तेंव्हा आहार घेतांना त्या बद्दल भरपूर दक्षता बाळगा आपल्याला आवश्यकता असेल आणि शारीरिक गजरेचे लक्ष ठेवून आहार घ्या. आपल्या गृहरक्षक दलाला आरोग्याच्या सुचना देतांना बेशिस्तीची वागणूक कोणी गृहरक्षक करेल तर त्याची गय मी करणार नाही असा इशारा पण दिला.
या प्रसंगी गृहरक्षक दलाचे संस्थापक तथा माजी प्रधानमंत्री मोरारजी देसाई, पहिले सीडीएस विपीन रावत यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून सर्वांनी त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमात केंद्र नायक अरुण परिहार यांनी नांदेड गृहरक्षक दलाची माहिती दिली. डॉ.अशोक बोनबुलवार यांचा समादेशक गृहरक्षक दल निलेश मोरे यांनी सन्मान केला.
या कार्यक्रमात पलटन नायक रवि जेंकूट बी.जी. शेख, नरेंद्र जोंधळे, बालाप्रसाद जाधव, देविसिंह राजबन्सी, सुभाष. मांजरमकर, रविराज कोकरे, छाया वाघमारे, सुनिता कुलकर्णी, मंगल केदारे, द्रोपदा ओढणे, साधना सरपाते, सुनिता थोरात, संगीता गोडबोले, पंचफुला सावंत, छाया पद्मावार, मारोती गोरे, केशव गोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. शिबिरानंतर होमगार्ड व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. सकाळी जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर श्रमदान करुन साफ सफाई करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभारी समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार व्यक्त करण्याची जबाबदारी पलटन नायक अटकोरे यांनी पुर्ण केली.