नंदुरबार(प्रतिनिधी)- शहादा येथील सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था अवंतीका फाऊंडेशन नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असते.यात प्रामुख्याने संविधान विषयावर प्रबोधन आणि संविधान परिचय व्हावा यावर भर दिला जातो. असाच एक कार्यक्रम 10 डिसेंबर रोजी झाला.
10डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने अवंतीका फाऊंडेशन शहादा तर्फे तालुक्यातील खैरवे येथील जि.परिषद शाळेत “भारतीय संविधान आणि माझे अधिकार’ यावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यात प्रथम माया रमेश पवार, द्वितीय नंदिनी प्रताप भिल, तृतीय क्रमांक वैष्णवी सुनील भील ,तर उत्तेजणार्थ राज सुनील गिरासे, भूषण देविदास पानपाटील,रोशन धनराज पानपाटील व प्रियंका दशरथ कोळी यांना प्रमाणपत्र ,चित्रकला साहित्य इ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.या स्पर्धेत 18विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
संविधानातील मुलभूत हक्क आणि कर्तव्ये हे अतीशय सोप्या भाषेत खेळीमेळीचे वातावरण निर्माण करुन अवंतीका फाऊंडेशनच्या अध्यक्षा पल्लवीताई प्रकाशकर यांनी मुलांना समजावून सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खैरवे ग्रा.पंचायत सरपंच प्रविण निकुंबे,ग्रा.पंचायत सदस्य मनोहर कोळी,राजू पानपाटिल ,एकलव्य भिल्ल संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मोरे ,रामचंद्र ठाकरे ,अवंतीका फाऊंडेशनच्या संस्थापिका पल्लवी प्रकाशकर इ मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळात उत्तम सहकार्य करणाऱ्यांचा देखील अवंतीका फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन शिक्षक चंद्रशेखर वाडिले यांनी तर आभार शिक्षक प्रेमसिंग गिरासे यांनी मानले आणि स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रतिलाल अखडमल यांनी मार्गदर्शन केले.
