नांदेड(प्रतिनिधी)-उमरी बाजार येथील द हॉलमार्क इंटरनॅशन स्कुल या संस्थेला फक्त प्राथमिक शाळेची मान्यता असतांना त्यांनी 6 आणि 7 वी इयत्तेचे वर्ग बेकायदेशीररित्या चालवले आहेत. याबद्दल गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार देवून सुध्दा अद्याप काही कार्यवाही झाली नाही.
आपली मुली इंग्रजी शाळेत शिकावीत या पालकांच्या भावनेचा फायदा संस्था चालकांनी घेतला आणि छोट्या-छोट्या गावात सुध्दा इंग्रजी शाळा सुरू झाल्या. अशीच एक शाळा उमरी बाजार ता.किनवट येथे आहे. या शाळेचे नाव हॉलमार्क इंटरनॅशन स्कुल असे आहे. या शाळेला फक्त प्राथमिक शाळेची मान्यता असतांना सुध्दा माध्यमिक वर्गातील सहावी आणि सातवी ही दोन वर्ग बिना परवानगीचे चालवले जातात. या बद्दल एका पालकाने 12 ऑक्टोबर 2021 रोजी किनवट गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली पण अद्याप त्यावर कांहीच कार्यवाही झालेली नाही.
आपल्या मुलाला शाळा बाह्य विद्यार्थी दाखविण्यात आले आहे. याबद्दल प्रशासनाकडे विचारणा केली असता ते याबद्दल माहिती नाही असा सावध पवित्रा घेत बोलत असतात. इंग्रजी शाळांमध्ये बहुतांश शासकीय सेवेतील जनता, शिक्षक, प्राध्यापक यांची मुले शिक्षण घेतात तरीपण हे पालक याबद्दल काही एक आक्षेप घेत नाहीत अशा परिस्थितीत या मुलांना शाळाबाह्य मुले या सदरात दाखवून त्यांचा अभिलेख तयार केला जात आहे.
