ताज्या बातम्या

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तीन जणांना ३० हजार रोख दंड; एका वर्षाची सक्तमजुरी 

नांदेड,(प्रतिनिधी)- संशयीत गुन्हेगारांना शोधण्याचे काम करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तीन गुन्हेगारांना ७ वर्षांनंतर सत्र न्यायाधीश एस.इ. बांगर यांनी प्रत्येकाला एक वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
                     याबाबत सविस्तर माहिती अशी की,१७ मे २०१४ रोजी इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार बळीराम व्यंकटराव राठोड आणि मुंढे हे दोघे संशयीत गुन्हेगारांचा शोध घेत रात्री १० वाजता गांधीनगर भागात गेले होते.तेथे ते आपल्या बातमीदारासोबत बोलत उभे असतांना अमोल उर्फ बाळू पुंडलिकराव देवके (२४) कपिल पुंडलिकराव देवके (२४) आणि निलेश सुदाम कांबळे (२१) सर्व रा.गोविंदनगर नांदेड यांनी दोन्ही पोलीस अंमलदारांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. गांधीनगर हा भाग विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने बळीराम राठोड यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ६४/२०१४ भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३,३३२,३४,५०४,५०६ नुसार दाखल करण्यात आला.पोलीस अंमलदार  मल्लिकार्जुन कारामुंगे यांनी पोलिसांना मारहाण करणाऱ्या तीन गुहेगारांना पकडले.सविस्तर तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. त्यावर सत्र खटला क्रमांक ६६८/२०१४ नोंदवण्यात आला.
                    न्यायालयात सादर करण्यात आलेले तोंडी आणि लेखी पुरावे तसेच जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.आशिष गोदमगावकर यांनी केलेली मेहनत आणि ऍड यादव तळेगावकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून पोलिसांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा करणाऱ्या अमोल उर्फ बाळू पुंडलिकराव देवके (२४) कपिल पुंडलिकराव देवके (२४) आणि निलेश सुदाम कांबळे (२१) सर्व रा.गोविंदनगर नांदेड तिघांना सत्र न्यायाधीश एस.इ.बांगर यांनी प्रत्येकाला एक वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकाला १० हजार रूपे रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.या खटल्यात सहायक पोलीस उप निरीक्षक राठोड आणि पोलीस अंमलदार रामदास सूर्यवंशी यांनी पैरवी अधिकाऱ्याची भूमिका बजावली. तब्बल सात वर्षांनी या प्रकरणाचा निकाल आला आहे.
प्रकरणातील दोन पोलीस अंमलदार आता पोलीस उप निरीक्षक 
या प्रकरणातील फिर्यादी पोलीस अंमलदार बळीराम व्यंकटराव राठोड आणि मल्लिकार्जुन कारामुंगे हे दोघे पोल्सी उप निरीक्षक झाले आहेत.राठोड यांची नियुक्ती अर्धापूर पोलीस ठाण्यात आहे आणि मल्लिकार्जुन कारामुंगे यांची नियुक्ती ठाणे जिल्ह्यात आहे.  
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.