नांदेड

​ नांदेड जिल्हा पोलीस दलाचा लाडका पवन बोरा; पोलीस निरिक्षकाच्या अहवालावर करीता लिहुन कोणी तरी मारला कोंबडा

नांदेड(प्रतिनिधी)-तुरूंगात असलेल्या पवन बोराबद्दल पोलीस निरिक्षक वजिराबादचा रिपोर्ट असतांना त्यावर स्वाक्षरी करीता म्हणून कोणी तरी केली आहे. या अहवालानुसार पवन बोराला सुरक्षा रक्षक देवून परभणी येथे जाण्यास आमची हरकत नाही असे लिहिले आहे. पोलीस निरिक्षकाचा रिपोर्ट असतांना कोणी तरी करीता असा कोंबडा मारून पवन बोराच्या अहवालांवर स्वाक्षरी करतात म्हणजे मागील काळात नांदेड पोलीस दल पवन बोराच्या ताब्यात होते असे या अहवालावरून स्पष्ट होते.
पवन बोराच्या संदर्भाने वास्तव न्युज लाईव्हने भरपूर बाबी लिहिल्या. आज त्यांच्यासाठी वजिराबाद पोलीस ठाण्याने उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग यांना लिहिलेला एक रिपोर्ट प्राप्त झाला. या रिपोर्टवर तारीख लिहिलेली नाही पण हा रिपोर्ट डिसेंबर 2020 चा असल्याचे दिसते.हा अहवाल पोलीस निरिक्षक वजिराबाद नांदेड  यांच्यावतीने पाठविल्याचे लिहिलेले आहे. हा अहवाल उपविभाग शहर येथे पोहचला की, नाही याची माहिती त्या अहवालावरून होत नाही. या अहवालानुसार 9 डिसेंबर 2020 रोजी परभणी येथे जाण्याकरीता अंगरक्षक देण्यास हरकत नाही असे या अहवालात लिहिले आहे. त्यावर सविनय सादर असे लिहुन करीताचा कोंबडा अंकीत करून पोलीस निरिक्षक पो.स्टे.वजिराबाद नांदेड असे लिहिले आहे आणि यावर स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी कोणाची आहे याचा कांही बोध होत नाही. पण पोलीस निरिक्षकाच्या नावावर स्वाक्षरी करतांना शासनाच्या निर्णयाची अवहेलना करण्यात आली आहे. शासनाच्या नियमावलीनुसार करीता अशी स्वाक्षरी करायची असेल तर त्यावर आपले नाव आणि पदनाम लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. या अहवालावरून हे स्पष्ट होते की, मागील काळात पोलीस विभागाकडून पाहिजे ते करून घेण्याची किमया पवन जगदीश बोरा उर्फ शर्माकडे होती.
या अहवालात चार मुद्दे लिहिले आहेत. त्यामध्ये पवन जगदीश बोरा उर्फ शर्मा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार संरक्षण समिती (ही समिती अस्तीत्वातच नव्हती बोगस होती) रा.खंडेलवाल कॉम्प्लेक्स वजिराबाद नांदेड यांना 9 डिसेंबर 2020 रोजी परभणी येथे जाण्याकरीता अंगरक्षकाची आवश्यकता असल्याचा अर्ज माननिय पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे केला असल्याने त्याची चौकशी खालीलप्रमाणे आहे असे लिहिले आहे. मुद्दा क्रमांक 1 मध्ये पवन जगदीश बोराने सरीता संभाजी बिरकुले (नगरसेविका तथा बालकल्याण सभापती) यांचे पद रद्द करण्याचा अर्ज केला आहे. स्व.राजीव सातव यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याचा अर्ज केला आहे. आ.रत्नाकर गुट्टे यांना पवन बोराच्या अर्जावरून परभणी ते औरंगाबाद तुरूंग दाखवण्यात आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या स्वियसहाय्यकाने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा अर्ज पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे दिला आहे. गुजराथी शाळेची चौकशी पवन बोरामुळे लागली अशी अनेक कारणे यात लिहिली आहेत.
मुद्दा क्रमांक 2 मध्ये पवन बोराने दिलेल्या जबाबानुसार त्याला संरक्षण देणे गरजेच आहे असे लिहिले आहे. मुद्दा क्रमांक 3 मध्ये ना.अशोक चव्हाण यांच्या स्वियसहाय्यकाने दिलेल्या धमकी बाबतचा अर्ज पोलीस अधिक्षक कार्यालयातला आहे. तो अर्ज या अहवालात जोडला आहे. मुद्दा क्रमांक 4 नुसार पवन बोराला धमकी बाबत पोलीस स्टेशन वजिराबाद अभिलेखावर गुन्हे दाखल नसल्याची नोंद दिसून येत आहे. तरी पवन बोराला 9 डिसेंबर 2020 रोजी परभणी येथे जाणेकामी अंगरक्षक देण्यास आमची काही एक हरकत नाही असे लिहिले आहे.
मुद्दा क्रमांक 1 नुसार पवन बोराच्या तोंडी जबाबानुसार हा अभिलेख लिहिल्याचे स्पष्टपणे दिसते. मग चौकशी काय केली हा प्रश्न उपस्थित होतो. त्याने दिलेले सर्व अर्ज आहेत. त्यावर कार्यवाही काय झाली याचा कांही एक उल्लेख या अहवालात नाही. त्याचच जबाबानुसार संरक्षण देणे गरजेचे आहे असे लिहिले आहे. मग पोलीसांनी संरक्षणाबाबत चौकशी काय केली हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. असेही पोलीस दलात चालत होते असा एक जबरदस्त नवीन मुद्दा समोर आला आहे. सर्वसामान्य नागरीक, त्याचे जीवन आणि त्याची संपत्ती याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रिदवाक्य सद्‌ रक्षणाय खलनिग्रहणाय असे आहे. या अहवालानुसार तर याच्या उलट दिशेनेच सर्व कांही चालले असे दिसते आणि पोलीस निरिक्षकाचा रिपोर्ट असतांना त्यावर आपले नाव न लिहिता स्वाक्षरी करणाऱ्या महान व्यक्तीला मुजरा केला पाहिजे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *