नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अंमलदार आपल्या आजारी वडीलांना भेटण्यासाठी गंगाखेडकडे जात असतांना एका चार चाकी वाहनाने त्यांना धडक दिली आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार दि.4 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता घडली.
मुळ गंगाखेड येथे राहणारे शंभुदेव सदाशिव घुगे (32) हे नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदार बकल नंबर 89 नुसार सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. नियमित बंदोबस्ताच्या निमित्ताने सध्या त्यांना लोहा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले होते. शनिवार दि.4 डिसेंबर रोजी रात्री आपल्या वडीलांची तब्येत बरोबर नसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लोहा येथील पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांची परवानगी घेवून ते दुचाकी गाडीने गंगाखेडकडे जात असतांना पालम ते गंगाखेड या दरम्यान चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.24 एस.1822 या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली आणि यात त्यांचा मृत्यू झाला. गंगाखेडच्या पोलीस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर यांना घटनेची माहिती मिळताच त्या घटनास्थळी पोहचल्या.या बाबत नांदेड पोलीस दलाला माहिती दिली आणि पुढील कायदेशीर कार्यवाही केली. नांदेड जिल्हा पोलीस दलात या अपघाताने पोलीस अंमलदाराच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
