

नांदेड(प्रतिनिधी)-12 नोव्हेंबर रोजी झालेल्या धरणे आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या तीन जणांना इतवारा पोलीसांनी जेरबंद केल्यानंतर आज दि.03 डिसेंबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी या तिन आयोजकांना 5 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. हे सर्व रजा अकादमीचे सदस्य आहेत.
12 नोव्हेंबर रोजी त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात धरणे आंदोलन आयोजित करणाऱ्या तीन आयोजकांना इतवारा पोलीसांनी आज गजाआड केले आहे. 12 नोव्हेंबरच्या घटनेत अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार जखमी झाले.
12 नोव्हेंबर रोजी देगलूर नाका येथील एका चौकात रजाअकादमी या संस्थेच्यावतीने त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. धरणे आंदोलन संपल्यानंतर त्या जमावाने हिंसकता दाखवत दगडफेक आणि जाळपोळ केली. अनेक पोलीस अधिकारी या दगडफेकीत जखमी झाले. तेंव्हा इतवाराचे पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कांही नावांसह असंख्य अनोळखी लोकांविरुध्द गुन्हा क्रमांक 284/2021 दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 307, 353, 326, 427, 333, 337, 143, 147, 148, 149, जोडण्यात आली होती. त्या दिवशीच्या प्रकरणातील अटक झालेले अनेक जण अद्याप तुरूंगात आहेत.
इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार 12 नोव्हेंबरच्या कार्यक्रमातील तीन आयोजक अमुक ठिकाणी आहेत. त्यानुसार साहेबराव नरवाडे, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार गायकवाड, शेख खाजा आणि मोकले यांनी ते ठिकाणी गाठले. त्या ठिकाणी इम्रान खान युसूफ खान पठाण, शेख जुबेर शेख सादीक आणि रिजवान खान मुसा खान हे सापडले आहेत. या तिघांचा रजाअकादमी या संस्थेत सदस्य असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या तिघांना 2 डिसेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्त्येपोड यांनी पकडलेल्या रजा अकादमीच्या इम्रान खान युसूफ खान पठाण, शेख जुबेर शेख सादीक आणि रिजवान खान मुसा खान या तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी त्यांना 5 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.