एक गंभीर जखमी; मारहाण करणाऱ्याला पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड येथील तुरूंगात आपल्या सहकारी कैद्याला गंभीर दुखापत करणाऱ्या दुसऱ्या कैद्याला जामीन मिळाल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी अटक केली. या मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुख्य न्यायदंडाधिकारी योगेशकुमार रहांगडाळे यांनी 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. मारहाण करणारा आरोपी विक्की ठाकूर खून प्रकरणातील फिर्यादी आहे.
नांदेड न्यायालयात दि.22 नोव्हेंबर रोजी दोन कैद्यांमध्ये मारहाण झाली. त्यात सुबोध गंगाधर मवाडे (23) हा लिंबगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पोक्सो कायद्यानुसार सध्या तुरूंगात आहे. तुरूंगात दुसरा आरोपी सुरज भगवान खिराडे (26) हा बिघानीया गॅंगच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार कलम 307 नुसार इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात तुरूंगात आहे.तुरूंगात सर्व आरोपींना मोकळे ठेवण्याच्यावेळेत सुरज भगवान खिराडेने सुबोध गंगाधर मवाडेला पत्राने मारहाण केली.पत्रा तिक्ष्ण असल्याने सुबोधला जखमा झाल्या. कांही जाणकर मंडळी सांगतात की, जवळपास खंडीभर टाके सुबोध मवाडेला लागले आहेत. दि.24 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 423/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 326 नुसार दाखल करण्यात आला.
सुरज भगवान खिराडेची जामीन झाल्यानंतर वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांनी अटक केली. मुख्य न्यायदंडाधिकारी योगेश रहांगडाळे यांनी सुरज भगवान खिराडेला 4 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
