नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या मुलीच्या इलाजासाठी पुण्याला जाणे एकाला महागात पडले आणि चोरट्यांनी त्याचे घरफोडले. जुन्या नरसी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मेडिकल दुकान फोडण्यात आले आहे. एका टावर कंपनीतून चोरी झाली आहे.
नंदकिशोर नरसींगराव उत्तररार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 नोव्हेंबर रोजी ते आपले उस्माननगर रस्त्यावरील घर बंद करून आपल्या मुलीच्या इलाजासाठी पुण्याला गेले. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांचे घर फोडलेले होते. त्यांच्या घरातील 20 हजार रुपये किंमतीचा एक टी.व्ही. चोरून नेण्यात आला होता. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.
गणेश नारायण नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुन्या नरसी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचे मेडिकल आहे. 29 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता त्यांनी आपले दुकान बंद करून घरी गेले. 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानाचे शटर तोडल्याची माहिती मिळाली. येवून तपासणी केली असता त्या दुकानातील कॅशबॉक्समध्ये असलेले 4 हजार रुपये कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले होते. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार आडे अधिक तपास करीत आहेत.
सतिश कामाजी पिंपळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भोसी ता.भोकर येथे एका मोबाईल टावरमधील जनरेटरमध्ये असलेले 100 लिटर डिझेल किंमत 9500 रुपयांचे कोणी तरी चोरून नेले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
