क्राईम

हिमायतनगर येथील पं.स.कनिष्ठ सहाय्यक पाच हजाराच्या लाच मागणीत अडकला

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच कार्यालयातील सेवानिवृत्त व्यक्तीच्या बील मंजुरीसाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
हिमायतनगर येथील पंचायत समितीत कार्यरत कनिष्ठ सहाय्यक प्रकाश शंकरराव वाघमारे (50) हे आपल्याच कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या एका व्यक्तीचे अर्जीत रजा रोखीकरण देयक बिल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडून त्या बिलासाठी बजेटची मागणी करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली असा अर्ज एका 59 वर्षीय तक्रारदाराने 26 नोव्हेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता. 29 नोव्हेंबर रोजी या लाच मागणीची पडताळणी झाली आणि प्रकाश वाघमारेने ती लाच मिळविण्याचा प्रयत्न केला असे निष्पन्न झाल्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्यात प्रकाश शंकरराव वाघमारे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे, पोलीस उपअधिक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक शेषराव नित्तनवरे, दत्ता केंद्रे, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे, हनमंत बोरकर, ईश्र्वर जाधव, गजानन राऊत यांनी ही कार्यवाही पुर्ण केली.
लाच लुुचपत प्रतिबंधक विभागाने आजची माहिती देताना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल, ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 आणि पोलीस उपअधिक्षक धरमसिंग चव्हाण यांचा मोबाईल क्रमांक 9923417076 यावर सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.