नांदेड(प्रतिनिधी)-26/11 रोजी आतंकवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्यानंतर नांदेड येथील पत्रकार विजय जोशी यांनी सैनिक हो तुमच्यासाठी या संगीत कार्यक्रमाची सुरूवात केली. आज या घटनेला 13 वर्ष झाली आहेत. तरीपण सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. असाच प्रतिसाद यंदाही प्रेक्षकांनी दिला आहे.
नसानसातून वाहणाऱ्या देशभक्तीच्या उर्मीस चेतना देणारा सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम काल रात्री शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडला. मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या 13 वर्षापासून होत आहे. महाराष्ट्रात गाजलेली कलावंत रविंद्र खोमणे, मनव्वर अली, मालविका दिक्षीत आणि पत्रकार विजय जोशी यांच्या एकापेक्षा एक देशभक्तीपर गितांनी हा कार्यक्रम संपन्न झाला.
काल दि.26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत हे उपस्थित होते.
अशा देशभक्तीच्या कार्यक्रमामुळे देशप्रेमाची भावना तर निर्माण होतेच सोबत शहीदांचे स्मरण करताना त्यांच्या त्यागाची आठवण नव्या पिढीला व्हावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम पत्रकार विजय जोशी यांनी सुरु ठेवल्याबद्दल जिल्हाधिकारी व पोलीस उपमहानिरीक्षकांनी कौतूक केले. उद्घाटकीय सत्राचे संचलन विजय बंडेवार आणि गजानन पिंपरखेडे यांनी केलेले. कार्यक्रमाच्या मागची भूमिका पत्रकार विजय जोशी यांनी विशद केली. त्यानंतर हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महिला वाद्यवृंदाच्या तसेच दिग्गज वादकांच्या उपस्थितीत तब्बल तीस कलावंतांनी देशभक्तीच्या विविध रचना सादर केल्या. सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात गाजलेल्या मनव्वर अली यांनी तेरी मिट्टी, परवर दिगार, मॉ तुझे सलाम, ऐ वतन ऐ वतन मेरे या रचना सादर केल्या. मालविका दिक्षीत यांनी सैनिक हो तुमच्यासाठी, देश रंगीला, वंदे मातरम या रचना सादर करुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. प्रख्यात गायक रविंद्र खोमणे यांनी जिंदगी मौत ना, संदेसे आते है, मेरा रंग दी बसंती या रचना सादर केल्या. जहॉं डाल डाल पर, कर चले हम फिदा या दोन रचना प्रख्यात गायक आनंद लांडगे यांनी सादर केल्या. शूर आम्ही सरदार, गर्जा महाराष्ट्र माझा, म्यानातून उसळे आणि जयस्तुते या आगळ्यावेगळ्य एकत्रित केलेल्या देशभक्ती रचनांना रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सरतेशेवटी मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक महेश अचिंतलवार यांनी केले.महाराष्ट्रातील गाजलेल्या वादक, कलावंतांनी तसेच महिला वादकांनी या कार्यक्रमाची संगीत साथ दर्जेदार ठेवत कार्यक्रमाची रंगत वाढविली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना विजय जोशी यांनी जुनी आठवण सांगतांना सांगितले की, एक गायक विजय जोशी आणि एकच श्रोता रामप्रसाद खंडेलवाल अशा अनेक मैफीली रंगलेल्या आहेत. ज्यामध्ये एका श्रोत्याने दिलेल्या शाब्बासकीला मी विसरलेलो नाही.