महाराष्ट्र

कोविड आजाराने मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजार सानुग्रह अनुदान ;महाराष्ट्र शासनाचा निर्णय

नांदेड(प्रतिनिधी)-कोविड या आजारामुळे मरण पावलेल्या राज्यातील प्रत्येक व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. वसुल व वनविभागातील उपसचिव संजय धारुरकर यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
कोविड आजारामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या संदर्भात शासन निर्णय जारी करतांना त्यात केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे परिपत्रक, सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक 539/2021 आणि त्यातील अर्ज क्रमांक 1120/2021 या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले 4 ऑक्टोबर 2021 चे आदेश आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांचा शासन निर्णय या कागदांचा संदर्भ देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात कोविड आजाराने लाखो लोकांचा जीव घेतला आहे. शासनाने या मृतव्यक्तींना सानुग्रह अनुदान देण्याबाबत अनेक चर्चा झाल्या आणि त्या चर्चेच्या फलितार्थ शासनाने 50 हजार रुपये सानुग्रहन अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सानुग्रह अनुदान देण्यासाठी कोविड-19 असे निदान त्या व्यक्तीचे आवश्यक आहे. कोविड-19 चाचण्याच्या 30 दिवसात मृत्यू झाला असेल तर तो कोविड-19 चा मृत्यू समजण्यात येईल. अशा व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयाबाहेर झाला असेल आणि त्याने कोविड निदान झाल्यानंतर आत्महत्या केली असेल तरी हा कोविड मृत्यू समजण्यात येईल. कोविड निदान झाल्यानंतर बरे झालेला रुग्ण 30 दिवसानंतर मरण पावला असेल तरी त्याला कोविड मृत्यू समजण्यात येईल.
कोविड-19 नुसार मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकांनी राज्य शासनाने विकसीत केलेल्या बेवपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सेतु सुविधा केंद्र आणि ग्राम पंचायतीच्या संगणकावरुन हा अर्ज भरता येईल. अर्ज भरणाऱ्याने स्वत:चा तपशील आधार कार्ड क्रमांक, स्वत:चा बॅंक तपशील, मृत्यू  पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र आणि इतर नातेवाईकांचे ना हरकत घोषणा पत्र यासोबत जोडायचे आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा आधार नोंदणी क्रमांक उपलब्ध असेल तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या कोविड मृत्यूचा डाटा मरण पावलेल्या व्यक्तीच्या आधार क्रमांकासोबत जुळला तर संगणकीय प्रणालीवर हा अर्ज आपोआपच स्विकृत होईल.
राज्य शासनाने 26 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेला हा शासन निर्णय जनतेसाठी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक 202111261612210519 प्रमाणे प्रसिध्द केला आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा कोविड आजाराने मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आवाहन करत आहे की, शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार शासनाच्या संकेतस्थळावर आपल्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या संदर्भाने सानुग्रह अनुदान अर्ज सादर करावा.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.