नांदेड (प्रतिनिधी)- शिवणी ता. किनवट येथील भुसार दुुकान फोडून चोरट्यांनी 31 क्विंटल सोयाबीन चोरले आहे. या सोयाबीनची किंमत 2 लाख 1 हजार 500 रूपये आहे. तसेच नक्षत्र मंगल कार्यालयात एका महिलेचे 2 लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असलेली बॅग नांदेड शहरात चोरीला गेली आहे.
परमेश्वर मारोतराव माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 21 नोव्हेंबर रोजी रात्री आपली शिवणी येथील भुसार दुकान बंद करून ते घरी गेले असताना एका तासातच त्यांची दुकान कोणीतरी फोडल्याची माहिती प्राप्त झाली. येऊन तपासणी केली असता दुकानाचे शटर कोणीतरी रॉडने तोडले होते आणि त्यातून 31 क्विंटल सोयाबीन ज्याची किंमत 2 लाख 1 हजार 500 रूपये आहे चोरून नेले आहे. इस्लापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.
हरिहरराव माणिकराव क्षीरसागर रा. जिंतूर हे दि. 21 नोव्हेंबर रोजी नक्षत्र मंगल कार्यालय येथे लग्नात आले होते. त्यांच्या पत्नी लग्न कार्यालयातील भेटवस्तू स्वीकारत असताना त्यांनी आपल्या हातातील एक पर्स खाली ठेवली होती. ज्यामध्ये 2 लाख रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते. ती बॅग कोणीतरी चोरली आहे. भाग्यनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक भिसे अधिक तपास करीत आहेत.
