नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड येथे 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीची न्यायालयीन चौकशी व्हावी असे प्रतिपादन आपल्या धरणे आंदोलनात करत आ. अनिल बोंडे यांनी प्रक्षोभक भाषण करू नका अशी नोटीस मला पोलिसांनी दिली हेही सांगितले.
आज त्रिपुरा घटनेबद्दल भारतीय जनता पार्टीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यातआले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या पोलीस फौजफाट्यामध्ये अत्यंत छोट्या संख्येत भारतीय जनता पार्टीची मंडळी या धरणे आंदोलनात उपस्थित होती. प्रक्षोभक भाषण करू नये म्हणून मला नोटीस देण्यात आली. पण ज्या प्रक्षोभक भाषणामुळे 12 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये दंगल घडली त्यांना अटक अगोदर करा असे अनिल बांेंडे म्हणाले. राज्यातील रजाअकादमीवर कायम बंदी लादा अशी मागणीही केली. दंगल घडविणाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक करा असे अनिल बोंडे म्हणाले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर आ. अनिल बोंडे,खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रविण साले,आ. राम पाटील रातोळीकर, आ. तुषार राठोड, चैतन्यबापू देशमुख, डॉ. अनिल ढगे, शांतील खांडील, गिरीष डहाळे, अमोल कुलथीया, अमोल पाटील डोणगावकर आदींसह अनेक भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
