

पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांचे अनोळखी माणसाची ओळख पटविण्याचे जनतेला आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)-एका तासापुर्वी भोकर-उमरी रस्त्यावरील एका कापसाच्या शेतात एका 30 ते 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या शर्टने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी या अनोळखी मयत माणसाची ओळख पटवावी असे आवाहन जनतेला केला आहे.
नांदेड-उमरी रस्त्यावरील शिरुर सावरगाव फाटा येथे रावसाहेब पाटील यांच्या शेतात कापसाचे पिक रोवलेले आहे. या शेतात एक लिंबाचे जवळपास 15 फुट उंचीचे झाड आहे. या झाडावर एका 30 ते 35 वर्षाच्या अनोळखी माणसाने आपल्याच शर्टने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे लोकांनी पाहिल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले. उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार लगेच घटनास्थळी पोहचले. घटनास्थळावर दिसणाऱ्या परिस्थितीनुसार या अनोळखी मयत व्यक्तीचे वय 30 ते 35 वर्ष असावे. या मयत अनोळखी व्यक्तीच्या उजव्या हातावर इंग्रजीमध्ये नागेश असे गोंदलेले आहे आणि मराठी भाषेत गणेश असे गोंदलेले आहे. उमरीचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी माणसास कोणी ओळखत असेल तर त्यांनी याबाबत जलदगतीने पोलीस ठाणे उमरी येथे माहिती द्यावी किंवा मोहन भोसले यांचा मोबाईल क्रमांक 7038833358 यावर सुध्दा ही माहिती देता येईल.