नांदेड(प्रतिनिधी)-20 जुलै 2021 रोजी गाडीपुरा भागात विक्रम उर्फ विक्की दशरथसिंह ठाकूर या 32 वर्षीय युवकाचा खून केलेल्याप्रकरणात आता मकोका कायदा जोडण्यात आला आहे. आज मकोका कायद्याप्रमाणे कैलास बिघानीया आणि लक्की मोरे या दोन आरोपींना मकोका न्यायालयाचे न्यायाधीश एन.के.गौतम यांनी 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या अगोदर आतापर्यंत मकोका कायद्याअंतर्गत जवळपास 6 जणांची पोलीस कोठडी पुर्ण झाली आहे.
20 जुलै रोजी विक्की ठाकूरचा खून झालेल्याप्रकरणात कैलास बिघानिया गॅंगचे जवळपास 11 सदस्य अटक करण्यात आले. यात पुढे मकोका कायदा जोडला गेला. मकोका कायदा जोडल्यानंतर एका सत्रात चार आणि दोन सत्रात दोन-दोन अशा जवळपास 8 आरोपींना मकोका न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठविले होते. मकोका प्रकरणाचा तपास करणारे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक सुधारक आडे, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, पोलीस अंमलदार दासरवाड, हंबर्डे, गौतम कांबळे, गोविंद पवार आदींनी आज कैलास जगदीश बिघानिया (36), लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे पाटील(28) या दोघांना मकोका न्यायालयासमक्ष हजर केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड. यादव तळेगावकर यांनी या प्रकरणात पोलीस कोठडी देण्याची गरज कशी आहे याचे सविस्तर सादरीकरण केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एन.के.गौतम यांनी कैलास बिघानिया आणि लक्ष्मण उर्फ लक्की मोरे पाटील या दोघांना पाच दिवस अर्थात 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
